भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर (कर्करोग) झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सध्या मुंबईमधील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. आता किरण खेर यांचे पती अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

अनुपम खेर यांनी एक ट्वीट केले आहे. ‘माझी पत्नी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती एक फायटर आहे आणि ती या आजारावर लवकर मात करेन. तिची प्रकृती स्थिर आहे. किरण लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा’ असे अनुपम यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटवर चाहत्यांनी कमेंट करत किरण खेर लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने अनुपम खेर यांचे ट्वीट रिट्वीट करत किरण खेर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. ‘किरण लवकरात लवकर बऱ्या होऊ देत अशी मी देवाकडे प्रार्थना करते’ या आशयाचे ट्वीट माधुरीने केले आहे.

किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी ३१ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला खासदार किरण खेर या अनुपस्थित होत्या. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. ६८ वर्षी खेर यांना गेल्यावर्षी या आजाराचं निदान झालं होतं. सध्या त्या उपचार घेत असून मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली. त्यानंतर आता अनुपम खेर यांनी ट्वीट करत किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.