“महाराष्ट्राच्या लोकांना, जनतेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून अनेकांना अडकवलं जात आहे. गेल्या एका वर्षापासून हे प्रकरण सुरु आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. यातून महाराष्ट्र लोकांना, सरकारला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. या माध्यमातून बॉलिवूड मुंबईतून उत्तरप्रदेशला नेण्याचे भाजपाचं षडयंत्र आहे,” असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आर्यन खानच्या अटकेपासून क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी नवाब मलिकांनी भाजपवर थेट आरोप केला. “महाराष्ट्रामध्ये दादासाहेब फाळके, व्ही शांताराम अशा अनेक दिग्गजांनी बॉलिवूडमध्ये योगदान दिलं आहे. हे बॉलीवूड युपीमध्ये नेण्याचा भाजपाचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डाव आहे. समीर वानखेडे यांचा वापर करून बॉलिवूडला बदनाम करण्याचा आणि मुंबई बाहेर नेण्याचे हे षडयंत्र आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

महाराष्ट्रातील लोकांना, सरकारला बदनाम करण्याचा डाव

भाजपाकडून खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे. याद्वारे महाराष्ट्रातील लोकांना, सरकारला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. रेडकर ताई, तुमचा पती महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या कटाचा भाग आहे. या कटात महाराष्ट्राला, तसेच स्थानिक लोकांना बदनाम करण्याचा डाव आहे. मराठी अस्मितेच्या नावाखाली तुम्ही जी चादर ओढू पाहत आहात, ते यशस्वी होणार नाही, असेही नवाब मलिकांनी म्हटले.

आर्यन खानवरील गुन्हा सिद्ध झालेला नसतानाही त्याला तुरुंगात ठेवणं अन्यायकारक आहे. मी कधीही अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे नाव घेतलं नाही. त्यांच्याबद्दल कधीही कमेंट केलेली नाही. ही लढाई परिवार, धर्माविरोधात नाही. त्यामुळे यात वानखेडे कुटुंबाला गोवलं जात असल्याचा आरोप चुकीचा आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले.

गुन्हेगार नसेल तर त्यांना अटक होता कामा नये

आजही १०० हून अधिक लोक तुरुंगात आहेस ज्यांना चुकीच्या पद्धतीने डांबण्यात आलं आहे. अशा २६ प्रकरणांची चौकशी करावी. तसेच २२ क्रमांकाच्या प्रकरणात एका नायझेरियन व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं आहे. डीजी एनसीपींना मी फोटो पाठवला आहे. सीबीसीच्या निर्देशांनुसार ही २६ प्रकरण बंद न करता त्याची चौकशी करा, असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच गुन्हेगारांना पकडा हे तुमचं कर्तव्य आहे. पण जो गुन्हेगार नसेल तर त्यांना अटक होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.