नवनव्या तंत्रत्रानाचे माणसाच्या आयुष्यावर काय संभाव्य परिणाम होऊ शकतात, याची झलक पाहायची असेल तर नेटफ्लिक्सवरील ‘ब्लॅक मिरर’ ही वेबमालिका पाहावी. या मालिकेचा एक विशिष्ट असा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत या मालिकेचे सात सीझन आले आहेत. सातवा भाग अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. पण हा सीझन आधीच्या भागांहून वेगळा आहे. असं म्हणूया की ही मालिका अधिक प्रगल्भ झालेली पाहायला मिळत आहे, त्या अर्थी हा ताजा सीझन वेगळा आहे.
या मालिकेचा पहिला भाग आला २०११ मध्ये. ‘द नॅशनल अँथेम’ या पहिल्या भागात तंत्रज्ञानापेक्षाही प्रसारमाध्यमांचा अतिरेक आणि समाजमाध्यमांमुळे झटपट बदलणारे जनमत हा विषय होता. अर्थात हा विषय २०११ सालीही तसा काळाच्या पुढेच होता. या पहिल्या भागानंतर दर दोन-चार वर्षांच्या अंतराने आलेले सहा सीझन तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे दुष्परिणाम सांगणारे होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माणसं इतर माणसांवर अत्याचार, त्यांचं शोषण करण्यासाठी करतात, यावर प्रामुख्याने या सर्व भागांचा भर होता. त्यामुळे खरे तर या मालिकेला एकसुरीपणा आला होता. केवळ नवं तंत्रज्ञान काय असू शकते याची काय कल्पना लढवली आहे, हे पाहणं औत्सुक्याचे असे. सातव्या सीझनमध्ये मात्र तंत्रज्ञानाच्या परिणामांना कुठे माणुसकीची जोड दिली आहे, तर कुठे तंत्रज्ञानाच्या अतिरेकातून बाहेर पडण्याचे मार्गही सुचवले आहेत. एकुणातच १५ वर्षांनंतर आलेला सातवा सीझन अधिक प्रगल्भ झालेला पाहायला मिळतो.
‘ब्लॅक मिरर’च्या सातव्या सीझनमध्ये कल्पनारम्य तंत्रज्ञानाला खूपच आकर्षक स्वरूप दिलं गेलं आहे. मानवी चेतना साठवणं, अन्यत्र स्थलांतरित करणं या संकल्पनेवर हा संपूर्ण सीझन बेतलेला आहे. एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या विशिष्ट काळाचं संपूर्ण अस्तित्व क्लाउड किंवा तत्सम ठिकाणी साठवून ठेवता येऊ लागलं तर त्याचा पर्यायी वापर कसा करता येऊ शकेल, याची चुणूक या सीझनच्या सर्व सहा भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपांत दिसते.
‘कॉमन पीपल’ हा पहिला भाग अप्रतिम आहे. या भागात एक सामान्य जोडपं आहे. पत्नीच्या मेंदूमध्ये असलेल्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करता येत नसल्याने ती कोमात जाते. पण एक उत्साही विक्रेता तिच्या नवऱ्याला एक सबस्क्रिप्शन सेवा घेण्यास पटवते. याद्वारे त्याच्या पत्नीच्या मेंदूचं संपूर्ण अस्तित्व ‘क्लाउड’मध्ये अपलोड होते आणि ती या कृत्रिम आधाराने सुसह्य आयुष्य जगू लागते. पण हळूहळू तिचं आयुष्य कंपनी आपल्या जाहिरातींनी असह्य बनवते.
हॉटेल रेव्हरी हा एपिसोड आपल्याला नॉस्टॅल्जिक करतो तर युलॉजी नावाच्या भागात एका प्रेमाच्या नात्यातले भावनिक चढउतार अनुभवायला मिळतात.
थोडक्यात हा सीझन मानवी भावभावनांच्या अधिक जवळ जाणारा आहे. विज्ञान-कल्पनांच्या माध्यमातून प्रेम, आठवणी आणि अस्तित्व यावर भाष्य करणारे हे भाग एका वेगळ्याच प्रकारचा ‘ब्लॅक मिरर’चा अनुभव देतात.