काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जोधपूर येथील सत्र न्यायालयात हजर रहावे लागले. सुनावणी दरम्यान, सलमान खानला त्याचे मत नोंदविण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून १० मार्च रोजी न्यायालयात पुन्हा हजर राहण्याचे आदेश जोधपूर सत्र न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत.
त्यामुळे उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१२मध्ये सलमान विरोधातील आरोपावर पुन्हा सुनावणी सुरू केल्यानंतर सलमान खानचा या प्रकरणासंबंधी पुन्हा ‘तारिख पे तारिख’ प्रवास सुरू झाला आहे. वन्य प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ९/५१, ९/५२ आणि भारतीय दंडविधानाच्या कलम १४९ अंतर्गत सलमानवर नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमानला आज (बुधवार) जोधपूरच्या सत्र न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार सलमान खानने न्यायालयात हजेरी लावली आणि न्यायाधीशांनी पुढील सुनावणीसाठी १० मार्च रोजी पुन्हा सलमानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
डिसेंबर २०१३ मध्ये त्याच्या वकीलाने सलमानकडे विनापरवाना हत्यार बाळगल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले होते. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटांची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.