ग्लॅमर, गॉसिप्स, गल्ला पेटी आणि गप्पा या 4G च्या पलीकडे खूपच मोठी चित्रपटसृष्टी आहे. याचा प्रत्यय ‘शूटिंग, डबिंग, रेकॉर्डिंग वगैरे सगळेच बंद’ अशा आंदोलनाच्या वेळेस येतो. पण पुढे काय?

अधूनमधून ‘चित्रपटसृष्टीत शांतता पसरली आहे’ हे सुरुच असते. १९८६ साली तर १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा ऐतिहासिक म्हणावा असा संप झाला. स्टुडिओ व चित्रपटगृह असे सगळेच ‘बंद’मध्ये सामील होते. तत्कालिन ‘स्टार्स’नी चक्क ऑपेरा हाऊस ते राजभवन असा मोर्चादेखील काढला. त्यामुळे रसिकांना पडद्यावरचे तारे प्रत्यक्षात बघायचा लाभ झाला. पण त्याच चाहत्यांची मागण्यांबाबत चित्रपटसृष्टीला सहानुभूती मिळाली नाही. कारण या व्यवसायाची प्रतिमा सुखवस्तू असल्याने येथे काही समस्या असतीलच, असे पटकन कोणी म्हणत नाही. तेव्हाच्या संपात एक महत्त्वपूर्ण मुद्दा तिकीट दरावरील करमणूक कर कमी करावा असा होता. कालांतराने मल्टिप्लेक्स युगात अव्वाच्या सव्वा झालेले तिकीट दर कमी व्हावेत हे मात्र कोणालाच वाटले नाही. काळानुसार काही संदर्भ बदलत राहिले तर काही समस्या कायम राहिल्या. त्या प्रामुख्याने या व्यवसायातील कामगारांशी निगडीत आहेत आणि त्यासाठीच येथे अधूनमधून एक दिवसापासून चार पाच दिवसापर्यंतचे ‘संप अथवा बंद’ होत राहतात. अनेक संपाप्रमाणेच काही आश्वासने मिळतात तर कधी रोजगार बुडण्याच्या भीतीने काहींचा संयम सुटतो. ग्लॅमरच्या चेहर्‍यामागचे हे वास्तव फारच भयाण आहे. मुंबईतील काही खूपच जुन्या स्टुडिओतील मेकअप रुम बराच काळ सुधारल्या नसल्या तरी त्यावर प्रशस्त व्हॅनिटी हा उपाय सापडलाय. पण टॉयलेट गचाळ आहेत. ती नवीन व स्वच्छ असणे आवश्यक आहेच. यापासून या कामगारांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. चित्रीकरणाचे तास निश्चित करणे, दैनंदिन अथवा मासिक पगारवाढ, कामासंदर्भात करार, चित्रीकरण लांबल्यास अधिकचा ओव्हर टाईम, नाश्ता व जेवणाचा दर्जा सुधारणे, सेटवर एखादा अपघात झाल्यास त्या कामगाराला तातडीने मदत करणे, शासनाच्या नियमानुसार करार होणे, अशा काही मागण्या असून, त्यात ज्युनियर आर्टिस्टपासून स्टुडिओ कामगार असे सर्वच स्तरावरचे कष्टकरी आहेत. अनेक प्रकारच्या कला व विज्ञान यांचा संगम म्हणजे चित्रपट माध्यम या व्याख्येतील कला प्रकारात सेट उभारण्यापासून ते सेटवर जेवणाची व्यवस्था करण्यापर्यंत अनेक हात आहेत. प्रत्येक चित्रपटाचे युनिट व प्रत्येक स्टुडिओचा कामगार असे हे व्यापक विश्व आहे. जुन्या स्टुडिओत कित्येक नवीन छोट्या मोठ्या स्टुडिओची भर पडलीये. बंद पडलेल्या मिल (कुलाब्याची मुकेश मिल), कारखाने (साकी नाकापासून चारकोपपर्यंत) येथे शूटिंग सुरू झाली. मुंबईबाहेर नायगाव (वसई), सफाळा (विरार) येथपर्यंत स्टुडिओ वाढलेत. चित्रपटासह मालिका, गेम शोज, रिअॅलिटी शो, रिमिक्स संग्रह, जाहिरातपट, यु ट्यूब मालिका अशी अफाट निर्मिती वाढलीये. चित्रपटात मराठी हिंदीसह भोजपुरी तर झालेच कधी तेलगू, तमिळ इत्यादींचेही चित्रीकरण येथे होतेय. त्या प्रमाणात रोजगार वाढला. पण ज्युनियर डान्सरना मेकअप व कपडे बदलण्याची सुविधा वाढली काय? मोठे चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करतात याचे मोठ्ठाले आकडे गाजतात पण त्याचा त्याच चित्रपटाच्या युनिटला काही बोनस वगैरे मिळतो काय?

१९८६ चा चित्रपटसृष्टी संप : आपल्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात प्रसिध्द अभिनेता देव आनंद ट्रकवर बसून सामिल झाला होता.

याच चित्रपटसृष्टीत ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’सह (FWICE) तब्बल लहान मोठ्या मिळून २२ संघटना कार्यरत आहेत. त्या निर्मात्यांच्या संघटनेकडे मागण्या करतात. ‘इम्पा’, ‘गिल्ड’ अशा काही निर्मात्यांच्या संघटना आहेत. कधी चर्चेतून काही प्रश्न सुटतात तर कधी आश्वासनावर काम सुरु होते. यशराज, बालाजी अशा काही खासगी स्टुडिओ व राजश्री धर्मा प्रॉडक्शन्स यांची आपली सुनियोजित अशी कामाची पद्धत आहे. इतरही काही नावे असतील. अर्थात मनोरंजन उद्योगाचा झपाट्याने विस्तार झाल्याने काही समस्या सुटल्या नसाव्यात असेच वाटते. पूर्वीच्या त्या संपात तेव्हा खासदार असलेल्या सुनील दत्त व अमिताभ बच्चन यांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाकडून आश्वासने घेतली. अर्थात काही गोष्टी व नियमांच्या अंमलबजावणीला वेळ लागतोच. काही काळ मिथुन चक्रवर्ती या कामासाठी संघटनेत कार्यरत होता. या संघटना व निर्माते यांना साधणारा तो योग्य दुवा होता. मराठी चित्रपट महामंडळाची नवीन कार्यकरणी या सगळ्याबद्दल विशेष जागरूक आहे. काही कलाकार व निर्माते व्यक्तिगत पातळीवर हेअर ड्रेसरपासून एखाद्या गरजूला काही मदत करतात. धर्मेंद्र, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांची याबाबत आवर्जून नावे घेतली जातात. कोणी स्टार स्टाईलिश वागतो तर कोणी आपले शूटिंग संपले की निघतो. पण जेव्हा कोणीही चित्रपट कलाकार निर्माता होतो तेव्हा त्याला पटकन हा कामगार जाणवतो. सेटवर सकाळीच लवकर जाऊन दिवसभराच्या गरजेच्या गोष्टी आणल्यात ना हे सगळेच पाहावे लागते तर चित्रीकरण संपल्यावर उद्याच्या तयारीकडे लक्ष द्यावे लागते. अशा विविध स्तरावर हा व्यवसाय उभा आहे. पण हे वास्तव दुर्दैवाने दुर्लक्षित राहिलेय. ‘बहोत ही बडे स्टार’ हीच चित्रपटाची ओळख राहिल्याने अमूक स्टारची नवीन चकाचक गाडी यापासून त्याचे आवडते पर्यटन स्थळ यावरच कायम ‘फोकस’ राहिला. तो आपल्या स्टाफची निवड कशी करतो, त्यांना आपल्या खिशातून पगार देतो की निर्मात्याच्या हा प्रश्न काही उत्तरे देईलही कदाचित! ती उत्तरे सकारात्मक असतीलही कदाचित!! ग्लॅमरस मुखड्यामागे ही चित्रपटसृष्टी तंत्रज्ञ व कामगार यांनीच खच्चून भरलीये. कधी एखादी मुमताज ज्युनियर आर्टिस्टपासून करियर सुरु करते, दारासिंगच्या स्टंटपटाची नायिका म्हणून वाटचाल करीत दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्नाची नायिका होण्यापर्यंत झेप घेते तर स्टुडिओत कॅन्टीन बॉय म्हणून चहा देणारा बी. आर. इशारासारखा मेहनती, कष्टाळू माणूस ‘चेतना’ इत्यादी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून वादळी अशी स्वतःची ओळख निर्माण करतो हे देखिल याच सगळ्यातील वेगळेपणही आहेच. काही कला-दिग्दर्शक निर्माते-दिग्दर्शक झाले. मेकअपमन, संकलक, कॅमेरामन इत्यादीही असे पाऊल टाकतात. ही क्रिएटिव्ह माणसे कामगारांच्या व्यथा वेदना जाणीवा अधिकच समजून असतात. फार पूर्वी नाझमधले हमाल थिएटरवर प्रिंट घेऊन जात त्यानाही पावसाळ्यात रेनकोट हवा असे आणि चित्रनगरीतून रात्री उशिरा निघणार्‍या कामगारांची अनेक वर्षे बेस्ट बसची मागणी होती. ती काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाली. या सार्‍यातून एक गोष्ट लक्षात येईल की चित्रपटाच्या पडद्यामागचे विश्व अफाट तर आहेच पण त्यात छोट्या छोट्या गोष्टीही असंख्य आहेत. त्या ‘संपा’ शिवाय मिळायला काहीच हरकत नाही.
– दिलीप ठाकूर