एकच घटना किंवा एखादाच प्रसंग वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पाहिला की त्या प्रत्येकाची भिन्न आवृत्ती समोर येते. क्वचित घटनाक्रमात साधर्म्य जाणवतंही, पण प्रत्येकाच्या विचारातून त्या प्रसंगाचा मसावि आणि लसावि वेगळाच असतो. साध्या कानगोष्टी करतानाही एकाने सांगितलेली गोष्ट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेपर्यंत भलतंच रूप घेते, हे मनाचा खेळ सांगणारं वास्तव आपल्याही परिचयाचं आहे. हा प्रकार हिंदी चित्रपटातून कैकदा मांडला गेला आहे. मात्र, कुठल्याही घटनेचा आधार घेण्यापेक्षा त्यात अडकलेली एखादीच व्यक्ती सांगणार्याला आणि ऐकणार्याला वेगवेगळी भासते तेव्हा काय होतं? याचं कलात्मक चित्रण सिड विंचूरकर दिग्दर्शित ‘बोल बोल राणी’ चित्रपटात पाहायला मिळतं.
‘बोल बोल राणी’ चित्रपटाची कथा १९७० साली लिहिलेल्या भालचंद्र सुळे यांच्या ‘आणखी एक नारायण निकम’ या नाटकावर आधारित आहे. इतकी जुनी नाट्यकथा असूनही आपल्या दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या चित्रपटासाठी त्याचा आधार घ्यावा, असं वाटण्यामागेही वरवर दिसणार्या साध्या सरळ कथेतली गुंतागुंत दिग्दर्शक सिड विंचूरकर यांना अधिक भावली असावी. एका मुलाखतीत त्यांनी गेली कैक वर्षं ही कथा त्यांच्या मनात घोळत होती, असं म्हटलं आहे. या नाट्यकथेला पटकथेचं रूप देण्याचं काम सौरभ भावे आणि हिमांशू निंभोरकर या लेखकद्वयीने केलं आहे. नाट्यकथा ज्या तीन व्यक्तिरेखांवर बेतली आहे, त्यांची पार्श्वभूमी पाहता हा काळ निश्चितच जुना आहे. इथे नाही म्हटलं तरी काळाचा संदर्भ आजच्या वास्तवापासून पाहणार्याला अंमळ दूर करतो. या चित्रपटाची कथा माया या मुख्य व्यक्तिरेखेभोवती फिरते. कुठल्याशा हत्येच्या प्रकरणात माया प्रमुख आरोपी आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मायाच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी, नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करतायेत. मात्र, अनन्वित मार खाऊन, अत्याचार सहन करूनही मायाच्या तोंडून या घटनेबद्दल ‘ब्र’ निघत नाही. पहिल्या काही दृश्यचौकटीत दिसणारं हे दृश्य… जिथे मायाच्या तोंडी एक संवाद आहे, ‘आगीत काय जळालं हे राखेलाच माहीत’. इतकी चिवट मानसिकता असलेल्या मायाच्या बाबतीत काय घडलं आहे? हे जाणून घेत या हत्या प्रकरणाच्या तळाशी पोहोचण्याच्या निर्धाराने आभास नामक पत्रकार जिथे घटना घडली त्या सृजनपूरमध्ये येऊन पोहोचतो. गावात आल्यावर मायाबद्दल चटकन कोणी बोलणारं नाही हे त्याच्या लक्षात येतं. आणि तरीही कोणीतरी सापडेल तिच्याबद्दल सांगणारं या आशेने आणखी शोध घेऊ पाहणार्या आभाससमोर मायाची गोष्ट तीन वेगवेगळ्या अंगाने समोर येते. यातलं सत्य नेमकं कुठलं? याचं उत्तर आभासबरोबर प्रेक्षकही शोधायचा प्रयत्न करतात.
चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना दिसते एकच व्यक्ती ती म्हणजे ‘माया’. म्हणजे तिच्या हातून कोणाची तरी हत्या घडली आहे किंवा तिच्या उपस्थितीत ती घटना घडली आहे. मरणारा कोण होता? मारणारा कोण आणि पळून गेलेला कोण? हे या गोष्टीतलं गूढ आहे. एखाद्या घटनेची कितीतरी रूपं तुमच्यासमोर येतात, तेव्हा त्याच्यातून एकमेव सत्य सापडणं कठीण. मुळात पुन्हा ती व्यक्तीसापेक्ष गोष्ट होते. कोणाला माया निरागस वाटेल, कोणाला ती मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटेल तर कोणाला ‘हसीन दिलरुबा’ची आठवण येईल.
मनोवैज्ञानिक रहस्यकथेची मांडामांड करणारा हा चित्रपट दिग्दर्शकाने अत्यंत कलात्मकदृष्ट्या सजवला आहे. यातली प्रत्येक दृश्यचौकट आखीवरेखीव आहे. एकाच चौकोनात जेव्हा कथा घडते तिथेही कथेतील ताणतणाव, पात्राचा त्यावेळचा मूड यानुसार बदलणारी प्रकाशयोजना, रंगसंगती याचा केलेला विचार आपल्याला दिसतो, जाणवतो. व्हिवियन पुल्लन यांच्या कॅमेर्याने ते प्रत्येक दृश्य सुरेख पकडलं आहे. रहस्य, ताण वाढवण्यासाठी ध्वनीयोजनेचाही तितकाच उत्तम वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे.
संपूर्ण चित्रपट हा खर्या अर्थाने तीनच कलाकारांमध्ये घडतो. सई ताम्हणकरने मायाचं प्रत्येक रुप समरसून साकारलं आहे. चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे या दोघांनीही तीन वेगवेगळ्या पद्धतीची पात्रं सहज वठवली आहेत. या तिघांमधली जुगलबंदी पडद्यावर पाहताना मजा येते. मात्र, हे तुकडे तुकडे जोडत गेलो तरी मूळ गोष्टीच्या बाबतीत काहीच संगती लागत नाही. कथेची रचनाच अशी आहे की पाहणार्याला सत्य गवसणार नाही. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटाबद्दलचा संभ्रम असू शकतो किंवा चित्रपटात ते शोधू पाहणार्याने जे वास्तव स्वीकारलं आहे तसंच प्रेक्षकांनीही ते स्वीकारलेलं असू शकतं. आणि या सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी मूळ रहस्य गडद करण्यासाठी वापरलेली पात्रं, त्यांचा आगापिछा, काळाचा संदर्भ यात कुठेच सुसंगती दिसत नाही. घटना आत्ताच घडली आहे की इतिहासातली एखादी घटना आभासला खुणावते आहे? आभास या पात्राची रचना अत्यंत विसविशीत आहे. गावात बाईक घेऊन येणं, नंतर चालत फिरणं किंवा जीपवाल्याचा आधार घेणं, ज्या गोष्टीचा फक्त तोंडी संदर्भ ज्याच्याकडे आहे तो शेवटी कोणाची छायाचित्रं समोर रचून मायाच्या गोष्टीची उकल करतो आहे?, याचं उत्तर मिळत नाही. इतका देखणा आणि उत्तम अभिनयाने नटलेला हा चित्रपट आहे, तरीही कथेतल्या या विसंगतीमुळे त्यातलं गूढ मनाला भिडत नाही. मात्र, चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या अंगांचा काटेकोर विचार करून केलेली मांडणी हे ‘बोल बोल राणी’चं वैशिष्ट्य आहे जे सहजी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत नाही हेही तितकंच खरं.
दिग्दर्शक – सिड विंचूरकर
कलाकार – सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे, पद्मनाभ बिंड, माधुरी भारती आणि धनंजय सरदेशपांडे.
