सत्तरच्या दशकात डोंबिवलीतील लेखक भालचंद्र सुळे यांनी लिहिलेली नाट्यकथा कुमारवयापासून मनात घोळवणारा, पुढे त्याच कथेवर चित्रपट करायचा हे ठरवून न्यूझीलंडमधली आपली जाहिरात कंपनी विकून भारतात परतलेल्या दिग्दर्शक सिड विंचूरकर यांच्या ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या एकच खळबळ उडवून दिली आहे. सौरभ भावे आणि हिमांशू निंभोरकर या लेखकद्वयीच्या मदतीने जुन्या कथेला आधुनिक साज चढवत काहीतरी वेगळी कलाकृती देऊ पाहणारे सिड विंचूरकर आणि चित्रपटातील मुख्य भूमिकेतील कलाकार अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता संभाजी ससाणे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देत सनसनाटी निर्माण करणार्या या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया उलगडली.
चित्रपटाची कथा जशी रोमहर्षक वाटते आहे, त्याच अनुषंगाने यातल्या कलाकारांची निवडही लक्ष वेधून घेते आहे. या चित्रपटासाठी सगळ्यात पहिली निवड संभाजी ससाणे याची झाली. त्याचं एक खूप गहिरं असं छायाचित्र मी समाजमाध्यमांवर पाहिलं होतं. मी त्याची चौकशी केली, त्यावेळी तो ‘लव्ह अँड लावणी’ हे नाटक करत होता, त्यामुळे तो कलाकार आहे हे निश्चित झालं. मग मी त्याला भेटून कथा ऐकवली आणि त्याने होकार दिला. नायिकेच्या भूमिकेसाठी खरं तर रंगभूमीवरची अभिनेत्री हवी होती, मुख्य प्रवाहातील नायिकेविषयी विचारच झाला नव्हता, पण ज्या दोघींची नावं डोक्यात होती, त्यात एक सई होती. तिच्याशी अचानक भेट झाली आणि तिला कथा ऐकवून दहा मिनिटंही झाली नाहीत तर तिने ही भूमिका करायची आहे, असं सांगून टाकलं. सुबोध भावे एकाअर्थी पहिल्यापासून या चित्रपटाशी जोडले गेले होते, तर चित्रीकरण सुरू व्हायला अवघे दहा-पंधरा दिवस असताना चिन्मय मांडलेकरांचं नाव निश्चित झालं, असं विंचूरकर यांनी सांगितलं.
अटक गए तो ‘माया’ है…
‘एकच कपडा आपण आपल्या त्या त्या वेळच्या मन:स्थितीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे परिधान करू शकतो, तसंच एक व्यक्ती आपल्याला खूप वेगवेगळी भासू शकते, जाणवते, अशा पद्धतीची ही व्यक्तिरेखा आहे. आणि ‘माया’ हे तिचं नाव मला खूप आकर्षक वाटतं. या नावाला एक आध्यात्मिक किनारही आहे. ते म्हणतात ना, ‘जिंदगी में अगर ऐसी कोई सिच्युएशन आए जिस में आप नाच लिए तो ‘लीला’ है और अटक गए तो ‘माया’ है… यातला जो गर्भितार्थ आहे तो कुठेतरी माया या पात्राशी जोडलेला आहे. आणि अशा वेगळ्या व्यक्तिरेखा करायला मला नेहमीच खूप आवडतं’, असं सई ताम्हणकर हिने सांगितलं.
गोष्ट तुम्हाला गुंतवून ठेवत असेल तर…
‘रुबाब’ चित्रपटातील मुख्य भूमिकेनंतर अभिनेता संभाजी ससाणे ‘बोल बोल राणी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दिग्दर्शकाने चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा पहिल्यांदा अशा पद्धतीचं आपण काहीच याआधी केलेलं नाही, याची जाणीव झाली. दुसरं म्हणजे कथा ऐकत असताना मला स्वत:ला हे असं का झालं आहे? आता पुढे काय होईल? अशी उत्सुकता वाटत होती. श्रोता म्हणून आपल्याला एखादी गोष्ट गुंतवून ठेवत असेल, तर कलाकार म्हणून ती केलीच पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्याच अर्थाने माझ्यासाठी हा चित्रपट खूप वेगळा अनुभव होता‘, असं संभाजीने सांगितलं.
‘बी. ई. रोजगार’चा सिक्वेल येऊ दे…
संभाजीने याआधी भाडिपाच्या ‘बी. ई. रोजगार’ या वेबमालिकेत सई ताम्हणकरबरोबर एकत्र काम केलेलं आहे. ‘त्या मालिकेत आमची मैत्री महत्त्वाची होती, या चित्रपटात एक वेगळंच नातं आहे. सईबरोबर काम करणं हा खूप सर्जनशील आणि आनंददायी अनुभव असतो’, असं त्याने सांगितलं. अभिनेत्री म्हणून यशाच्या शिखरावर असताना तिला यूट्यूबवरच्या ‘बी. ई. रोजगार’ या वेबमालिकेत काम करावंसं वाटलं. अभिनय आणि भूमिकांच्या बाबतीत ती सातत्याने असे नवनवीन प्रयोग करत असते. तिचा अनुभव खूप दांडगा आहे आणि तरीही तिच्याबरोबर काम करताना नेहमीच नवीन काही करून पाहता येतं, शोधता येतं, एकमेकांच्या कामातलं काय आवडलं नाही हेही सांगता येतं, तो मोकळेपणा तिच्यात आहे. त्यामुळे काम करायला अधिक मजा येते, असं त्याने सांगितलं. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘पापड्या आणि वड्या’ची जोडी परतणार अशी चर्चा सुरू झाली आहे, याचा धागा पकडत सई आणि संभाजी दोघांनीही ‘बी. ई. रोजगार’चा सीक्वेल यायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली. ज्यांना ‘बी. ई. रोजगार’च्या सीक्वेल निर्मितीसाठी गुंतवणूक करायची असेल, त्यांनी थेट दिग्दर्शक सारंग साठ्ये याच्याशी संपर्क साधा, असं मिश्कील आवाहनही सईने केलं.
रात्रभर फोन करत राहिलो…
दिग्दर्शक सिड विंचूरकर यांनी ‘बोल बोल राणी’ चित्रपटाची मांडणी करताना प्रत्येक दृश्यचौकट ही पात्रांचा लूक, कपड्यांची-आजूबाजूच्या गोष्टींची रंगसंगती या सगळ्याचा विचार करून डिझाइन करण्यात आली असल्याचं सांगितलं. दिग्दर्शकीय पदार्पणातच चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे यांच्यासारख्या लेखक-दिग्दर्शक असलेल्या कलाकारांबरोबर काम करताना दडपण आलंच होतं, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. लेखक स्वत: शब्द-पात्रं, प्रसंग जन्माला घालत असतो, त्याची आकलनाची क्षमताच वेगळी असते, त्यामुळे अशा अनुभवी कलाकारांना दिग्दर्शन करणं सोपी गोष्ट नाही, असं सांगतानाच चित्रीकरणाच्या आदल्या रात्री सगळ्या आपल्या जवळच्या लोकांशी, मार्गदर्शकांशी फोनवर बोलून मन मोकळं करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय, प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होण्याआधी आपल्या टीमबरोबर प्रत्येक दृश्य आधीच मांडणी करून पाहिलं होतं, पूर्वतयारी खूप केली असल्याने चित्रीकरणाच्या वेळी काय काय होऊ शकतं, याबद्दल स्पष्टता होती. कलाकारांशीही सतत चर्चा केल्याने त्यांनाही तो दृष्टिकोन लक्षात आला होता. या पूर्वतयारीमुळेच चित्रपट अधिक खरा उतरला, असं ते म्हणाले.
मी ‘कट’ म्हणत नाही…
दिग्दर्शक म्हणून सिड अनेक वेळा एखादं दृश्य कसं साकारायचं हे कलाकारांवर सोडून देतो. माया हे पात्र साकारताना कुठल्याही प्रकारचे संदर्भ माझ्याजवळ नव्हते, अशा वेळी ते पात्र साकारताना तुम्ही चाचपडून पाहता. जोपर्यंत दिग्दर्शक ‘कट’ म्हणत नाही तोवर तुम्हाला उत्तम करत राहावं लागतं, त्यात तुम्हाला कलाकार म्हणून तुमच्यातल्या अनेक क्षमतांचा शोध लागतो, असं सईने सांगितलं. सईच्या याच म्हणण्याचा धागा पकडत सिड विंचूरकर यांनीही एखादं दृश्य चित्रित करत असताना आपण कट म्हणत नाही, असं स्पष्ट केलं. एखादं दृश्य देताना कलाकार जेव्हा अगदी तल्लीन होतात, तेव्हा कुठे मला त्यात हवे असलेले भाव मिळतात. त्यामुळे त्यांना जोपर्यंत थांबावंसं वाटत नाही, तोपर्यंत मी ‘कट’ म्हणत नाही. असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत, जे नियोजित नव्हते पण, प्रत्यक्ष चित्रीकरण करताना ते सापडत गेले, असं त्यांनी सांगितलं.
