खिलाडी कुमार या नावाने बॉलिवूडमध्ये आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. या दिवशी त्याच्यावर मित्रपरिवारासोबतच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. या साऱ्या उत्साही वातावरणात खिलाडी कुमारला आणखी एक खास भेट मिळाली. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या यादीनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी म्हणून अक्षयच्या नावे शिक्कामोर्तब झालं आहे.

‘गोल्ड’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्यावेळी अक्षय कुमार १४ भारतीय भाषांमधील मुख्य १२५ वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. ‘अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया’ या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे.

या आकडेवारीनुसार अक्षय ८७ गुणांसह न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला. तर बिग बी अमिताभ बच्चन ८२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि अभिनेता सलमान खान ७१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यामागोमाग ऋषी कपूर आणि वरुण धवनच्या नावांचाही समावेश होतो.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

दरम्यान, या यादीविषयी ‘स्कोर ट्रेंड्स’चे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणाले, “अक्षयच्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजनंतरही तो सामाजिक कार्यामुळे सतत चर्चेत होता. वर्तमानपत्रात त्याच्या फॅमिली हॉलिडेपासून ते सिनेमांच्या रिलीज आणि आणि फिटनेसबद्दल जे काही लिहून आले त्यामुळे तो सर्वाधिक चर्चिला गेलेला बॉलीवूड स्टार ठरला.”

ते पुढे म्हणाले, “१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”