राजीव भाटिया नावाच्या कोणा एका अभिनेत्याला ओळखता का..? असा प्रश्न विचारला तर बरेचजण हा कोणता अभिनेता? असं म्हणत त्या अभिनेत्याला आठवण्यात वेळ दवडतील. पण, तुम्हाला माहितीये का अभिनेता अक्षय कुमारच खरं नाव राजीव भाटिया आहे. शालेय जीवनामधील एका परीक्षेत नापास झालेल्या याच अभिनेत्याने आज राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील अभिनयासाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याचाच आनंद व्यक्त करत अक्कीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ प्रदर्शित केला.

बालपणीच्या आठवणीत रंगलेला खिलाडी कुमार या व्हिडिओमध्ये बऱ्याच विषयांवर पोटतिडकीने बोलताना दिसतो. मुख्य म्हणजे आजवरच्या कारकिर्दीत आपल्या वाट्याला आलेल्या यशाचं श्रेय तो त्याच्या आई-वडिलांनाही देतोय. मुख्य म्हणजे या व्हिडिओमध्ये अक्कीने त्याच्या बालपणीची एक आठवणही सांगितली. ‘शाळेत असताना एका इयत्तेत मी नापास झालो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की आज काही आपली खैर नाही. घरी गेल्यावर बाबा आपल्याला चांगलच धारेवर धरणार. पण, त्यांनी तसं काही केलं नाही. याउलट त्यांनी मला समोर बसवून तुला नक्की काय करायचंय, तुला कशात आवड आहे असं विचारलं. त्यावेळी मला खेळांमध्ये रस असल्याचं मी त्यांना सांगितलं. मग वडिलांनी मला त्यावरच लक्ष केंद्रित करायला सांगितलं.’, ही आठवण सांगत अक्कीने तो आज ज्या ठिकाणी आहे त्याचं श्रेय आई-वडिलांना दिलं. ‘माझे सुप्तगुण ओळखण्यासाठी आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे.’ असंही तो म्हणतो.

यशापयशाचं हे गणित समजावून सांगतानाच अक्षयने आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाविषयीही त्याचं मत मांडलं. अक्षयने मांडलेल्या काही आकडेवारीनुसार दरवर्षी जवळपास आठ लाख लोक आत्महत्या करतात. ज्यामध्ये दीड लाख तरुण-तरुणींचा समावेश आहे. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अभ्यास किंवा मग रिलेशनशिपमुळे येणारा ताण. पण, हे असं का व्हावं…? असा प्रश्नही त्याने या व्हिडिओत उपस्थित केला आहे. अक्षय कुमारने या व्हिडिओतून आयुष्याची थट्टा करु न करण्याचा सल्लाही सर्वांचा दिला आहे. आयुष्य सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, असं म्हणत त्याने ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या या अभिनेत्याविषयी आणखी सांगायचं झालं तर चित्रपटसृष्टीसोबतच काही जनहिताच्या कामातही त्याचा हातभार असतो. देशाप्रती आपले प्राण पणाला लावणाऱ्या सैन्यदलातील जवानांसाठीही खिलाडी कुमार सढळ हाताने मदत करतो. सध्या तो आगामी ‘पॅडमॅन’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून, येत्या काळात विविध धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.