‘रफ्ता रफ्ता देखो देखो क्या हो गया’, हे गाणं आठवतंय का? आठवत असेलच. मुख्य म्हणजे या गाण्याप्रमाणेच हा चित्रपटही अनेकांच्याच आवडीचा आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातील हे गाणं. विपुल शहा दिग्दर्शित या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नमस्ते इंग्लंड’ असं चित्रपटाचं नाव असून, त्यात एक ट्विस्टही असणार आहे. पण, हा ट्विस्ट कितीजणांना भावतो यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

‘नमस्ते लंडन’च्या सिक्वलमध्ये बरेच फेरबदल करण्यात आले असून, कथानकाच्या दृष्टीनेही बऱ्याच गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. या चित्रपटासंबंधी असंही म्हटलं जातंय की, खिलाडी कुमारऐवजी अभिनेता अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत झळणार आहे. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सर्व काही सुरळीत पार पडले तर अक्षयची एक्झिट अर्जुनसाठी फायद्याची ठरणार आहे. सध्याच्या घडीला अक्षय त्याच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे ‘नमस्ते लंडन’ चित्रपटाला तो फारसा वेळ देऊ शत नव्हता. त्यामुळे या चित्रपटातून त्याची गच्छंती झाल्याचं म्हटलं जात आहे. त्याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये तो ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एकंदर चित्रपटाचं वेळापत्रक पाहता अक्षय ‘नमस्ते लंडन’च्या सिक्वलमध्ये दिसणार नाही हे जवळपास नक्की झाल्याचं कळत आहे.

वाचा : चित्रपटांच्या सेटवरच जुळल्या या सेलिब्रिटींच्या रेशीमगाठी

अर्जुनसोबतच स्क्रीन शेअर करण्यासाठी या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्राचंही नाव पुढे येत आहे. चित्रपटाविषयी अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. सध्या परिणीती ‘गोलमाल अगेन’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तेव्हा आता या चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा कधी होते याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा