ते वक्तव्य अपमानास्पद नव्हतं- चंकी पांडे

फराह खानच्या ‘त्या’ कमेंटने अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या

Chunky Pandey
चंकी पांडे

काही आठवड्यांपूर्वी चंकी पांडेची मुलगी अनन्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच तिचं असं चर्चेत येणं अनेकांना थक्क करणारं होतं. पण, असं अनपेक्षितपणे चर्चेत येण्यामागे कारणही तसंच होतं. चंकी पांडेच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनन्याचा एक फोटो पोस्ट केला होता. त्याच फोटोवर कमेंट करत ‘प्लीज हिची डीएनए टेस्ट करा. चंकी पांडेची मुलगी आणि तीही इतकी सुंदर….’, अशी कमेंट फराह खानने केली होती. तिच्या या कमेंटनंतर अनेकांच्याच भुवया उंचावू लागल्या.

फराहच्या या कमेंटबद्दल अनेक चर्चा रंगल्या, कित्येकांनी अनन्याबाबतची माहिती जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यावर खुद्द चंकी पांडे काय प्रतिक्रिया देणार याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. सरतेशेवटी चंकीने याविषयी प्रतिक्रिया दिली. फराहच्या ‘डीएनए’ टेस्टविषयीच्या ‘त्या’ कमेंटविषयी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना चंकीने फराहची कमेंट आपल्याला फार आवडल्याचं स्पष्ट केलं. ‘फराह फार चांगली आहे. त्यामुळे तिच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय हे मी चांगलच जाणतो. त्यातही तिने अनन्याला ‘अतिसुंदर’ असंही म्हटलंय. त्यामुळे तिने एका अर्थी प्रशंसाच केलीये’, असं तो म्हणाला.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

फराह खान आणि साजिद खान यांच्या विनोदबुद्धीविषयी सांगावं तितकं कमीच आहे. ते कायमच एकमेकांची खिल्ली उडवत असतात, असंही चंकीने या मुलाखतीत स्पष्ट केलं. दरम्यान, चंकी पांडेची मुलगीसुद्धा इतर स्टारकिड्सप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. तिच्याविषयी होणाऱ्या चर्चा आणि तिला आतापासूनच मिळणारं प्रेम पाहून आपल्याला फारच आनंद झाल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor chunky pandey takes choreographer farah khans dna comment on daughter ananya as a compliment