सौंदर्य, निरागसपणा आणि आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी एक अभिनेत्री म्हणजे सायरा बानो. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सायरा बानो यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘जंगली’ या पदार्पणाच्या चित्रपटातूनच त्यांना शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली होती. सायरा बानो यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगल्या.

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कोहिनूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो यांनी लग्न केलं. वयाच्या २२ व्या वर्षी सायरा आणि दिलीप कुमार विवाहबंधनात अडकले. फार कमी वयातच सायरा बानो दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करु लागल्या होत्या. सायरा यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत १९६६ मध्ये लग्न केले.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या नात्यात सर्व काही सुरळीत सुरु असतानाच एक वादळ आलं. दिलीप कुमार यांनी १९८२ मध्ये अस्मा साहिबा यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे सायरा बानो फार खचल्या होत्या. दिलीप कुमार यांनी अस्मा यांच्यासोबत विवाह झाल्याचे बरेच दिवस सर्वांपासून लपवले. पण, ही बाब जेव्हा सर्वांसमोर उघड झाली तेव्हा मात्र अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अर्थात त्यांचं हे दुसरं लग्न फार काळ टिकले नाही. कुमार यांनी अस्मापासून वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकदा सायरा बानो यांचीच साथ दिली. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या नात्यातील हा एक प्रसंग वगळता आणखी कोणतेही वादळ आले नाही. आजच्या घडीला जवळपास पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या दोघांनी एकमेकांची साथ दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील ‘स्टार कपल’ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.