आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान याचं बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज (बुधवारी) सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. शनिवारी इरफानची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. आपला मुलगा या आजारातून ठणठणीत बरा होऊन आपल्या घरी येईल, अशी त्यांची अंतिम इच्छा होती. परंतु त्यांची ती अंतिम इच्छा अपूर्णच राहिली. इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांच्या जयपूर येथील निवासस्थानीही शोककळा पसरली आहे.

रमझानच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच शनिवारी इरफानच्या आईचं निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे त्याला आपल्या आईच्या अंतिम दर्शनासाठीही जयपूर येथे जाता आलं नव्हतं. परंतु अखेरच्या श्वासापर्यंत त्या आपल्या मुलाच्या म्हणजेच इरफान खानच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत होत्या. आपला मुलानं या आजारावर मात करून लवकरात लवकर घरी यावं अशी आईची अंतिम इच्छा होती, अशी माहिती इरफान खान यांचे बंधू सलमान यांनी दिली. लॉकडाउनमुळे आपल्या घरी जाता येत नसल्यानं इरफाननं व्हि़डीओ कॉलद्वारे आपल्या आईचं अखेरचं दर्शन घेतलं होतं.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.