बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. यानंतर आता कंगनाने तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर आता अभिनेता कमाल आर खान हिने कंगनाच्या अटकेची मागणी केली.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर नेहमी त्याचे मत मांडताना दिसतो. केआरकेने नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. त्याने नुकतंच ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

केआरकेने त्याच्या ट्वीटरवरुन कंगनाच्या विरोधात टीका केली आहे. केआरके म्हणाला की, “कंगना रणौत उघडपणे मारणे, कापणे आणि हिंसाचार याबद्दल बोलत असते. मात्र आतापर्यंत असा कोणताही कायदा नाही जो कंगनावर लागू होतो. असे कसे? इतर कोणी जर अशी पोस्ट केली असती तर तो आतापर्यंत जेलमध्ये असतात. कायदा सर्वांवर लागू होत नाही का?” असे प्रश्न केआरकेने उपस्थित केले आहे.

हे प्रश्न विचारताना त्याने मुंबई आणि पंजाब पोलिसांना टॅगही केले आहे. दरम्यान केआरकेने कंगनाविरोधात केलेले हे ट्वीट तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक कलाकार आणि नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

कंगना रणौत वक्तव्याविरोधात तक्रार दाखल

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.