Nauheed Cyrusi Kissing Scene : आजकाल चित्रपटसृष्टीत किसिंग आणि रोमँटिक सीन करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि मिळणार प्रतिसाद, यामुळे चित्रपट निर्मातेदेखील आवर्जून अशी दृश्ये चित्रित करत आहेत. अनेकांनी याचा मोकळेपणाने स्वीकार केला. मात्र, आजही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी हे सीन करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि या नकारामुळे अभिनयामध्ये कुशल असूनही त्यांच्या संधी नाकारल्या गेल्या आहेत. चित्रपटसृष्टीची हीच दुसरी बाजू अभिनेत्री आणि मॉडेल नौहीद सायरसीने मांडली असून तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अनवर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नौहीद सायरसी ही मागील अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीतून गायब झाली. अग्गर, भूतनाथ, कुर्बान आणि जय हो या हीट चित्रपटांनंतर तिने सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली. अभिनेत्री नौहीद हिने चित्रपटांमध्ये काम करणे का थांबवले याचे खरे कारण सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने सिनेविश्वातील सत्य समोर आणले. चित्रपटांच्या कथानकांमध्ये मुद्दाम किसिंग सीन टाकले जात असल्याचा दावादेखील तिने केला आहे.

नौहीद सायरसी का करत नाही चित्रपटांमध्ये काम?

नौहीद सायरसी हिने ४ मे रोजी व्हिडीओ शेअर करून सोशल मीडियावर तिचे स्कीनकेअर रुटीन सांगितले. यावेळी स्क्रीनवर तिच्या इन्स्टाग्राम मेसेजमधील एक स्क्रीनशॉट दाखवला. यामध्ये तिच्या चाहत्याने चित्रपट का करत नाही असे विचारले होते. यावर उत्तर देत अभिनेत्री नौहीद सायरसी म्हणाली, “एकाच फटक्यात दोन पक्षी मारता येतील का? हाच प्रश्न मला सर्वात जास्त विचारला जातो.”

चित्रपटाच्या कथेमध्ये गरज नसताना किसिंग सीन

चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमरमध्ये काम करणे हे सुरुवातीला अत्यंत उत्साह देणारे असते, नंतर मात्र समोर येणाऱ्या अपेक्षा अस्वस्थ करतात असे सिनेविश्वातील वास्तव तिने अधोरेखित केले. अभिनेत्री सायरसी पुढे म्हणाली की, “चित्रपटांच्या करारावर स्वाक्षरी केली की किसिंग सीनला संमती दिली असे गृहीत धरले जाते. चित्रपटाच्या कथेची गरज आहे की नाही हेही न पाहता कारण नसताना असे सीन करायला सांगितले जातात. चित्रपटाच्या कथेमध्ये अधिकाधिक प्रमाणात आणि अनावश्यकपणे बोल्ड सीन समाविष्ट केले जातात,” असे अभिनेत्री नौहीद सायरसी हिने सांगितले.

असे सीन स्क्रीनवर चांगले दिसत नाही – नौहीद

पुढे ती म्हणाली की, “मला तर असं वाटू लागलं आहे, ते किसिंग सीनचा अनावश्यक भडिमार करत असतात आणि मला असे मनापासून वाटते की, हे करताना खरंच आपण स्क्रीनवर चांगले दिसत नाही. याचे नक्की कारण काय ते मला माहिती नाही. त्यांना नीट चित्रीकरण करता येत नाही किंवा मला माहिती नाही पण ते नक्कीच चांगले दिसत नाही.”

किसिंग सीनला नकार दिल्याने करिअरवर परिणाम

किसिंग सीनसाठी नकार दिल्याने तिच्या अनेक अभियनाच्या संधी हुकल्याचे नौहीद सायरसीने सांगितले. याची खूप मोठी व्यावसायिक किंमत चुकवली असून अनेक भूमिकासांठी तिला डावलण्यात आले असल्याचे सांगितले. अभिनेत्री नौहीद सायरसी म्हणाले की, “यामुळे मी हो किंवा नाही म्हणण्यापूर्वीच मला नाकारले जाते, कारण मी अशा सीनला नकार देते. मला किसिंग सीन करण्यास अजिबात सोयीस्कर वाटत नाही.”

निर्मात्यांनी मुद्दाम बुडवले मानधन

चेहऱ्यावर ‘स्पॉट-ट्रीटमेंट सीरम’ लावताना अभिनेत्री नौहीद सायरसी हिने निर्माते हे कलाकारांचे पैसे बुडवत असल्याचे उघड केले. करारावर स्वाक्षरी करताना दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत आणि मु्द्दाम सबबी सांगून मानधन देत नाहीत अशी खंत तिने व्यक्त केली. नौहीद म्हणाली की, “चित्रपटाचे माझे काम मी पूर्ण केले. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझ्या मानधनातील सुमारे २५ टक्के रक्कम निर्मात्यांनी स्वतःकडे रोखून धरली आणि मला ती रक्कम कधीच परत मिळाली नाही. ‘अरे, चित्रपट चांगला झाला नाही’, ‘तो चालला नाही’, ‘अमुक-तमुक झाले नाही’…अशी कारणं देऊन पैसे दिलेच नाहीत. करार केलेले आहेत, मात्र त्यांच्यावर मी केस करू शकणार नाही,” असे म्हणत अभिनेत्री नौहीद सायरसी हिने सिनेविश्वातील सत्य मांडले आहे.