Paresh Rawal Praises Amruta Subhash Marathi Play: मराठी नाटकाचा चाहतावर्ग हा आता फक्त मराठीच राहिलाय असं नाही. इतर भाषांमध्येही मराठी नाटकाचा चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. मराठी सेलिब्रिटींनंतर आता अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही मराठी नाटकांचं आणि मराठी कलाकारांचे कौतुक करताना दिसतात. सामान्य प्रेक्षकांबरोबरच बॉलीवूडचे कलाकारसुद्धा मराठी नाटकांचे चाहते आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे परेश रावल.
परेश रावल हे मराठी नाटकांचे खूप मोठे चाहते आहेत. विविध मुलाखतींमधून त्यांनी मराठी नाटकांवरील त्यांचं प्रेम व्यक्तसुद्धा केलं आहे. आजवर अनेक मराठी नाटकं त्यांनी पाहिली आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘असेन मी नसेन मी’ नाटकाला हजेरी लावली होती.
सध्या रंगभूमीवर ‘असेन मी नसेन मी’ नाटक जोरदार सुरू आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक मराठी प्रेक्षकांसह परेश रावल यांनासुद्धा हे नाटक बघण्याचा मोह आवरता आला नाही. परेश रावल यांच्यासह अभिनेत्री विद्या बालनसुद्धा आई आणि बहिणीसह हे नाटक बघण्यासाठी गेली होती. परेश रावल हे विविध मुलाखतींमधून त्यांचं मराठी नाटकांवरील आणि कलाकारांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात, अशातच परेश रावल यांनी ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाचं सुद्धा कौतुक केलं आहे.
परेश रावक यांनी ‘असेन मी नसेन मी’ नाटक पाहल्यानंतर प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेचा व्हिडीओ अभिनेत्री अमृता सुभाषनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत परेश रावल म्हणतात, “‘असेन मी नसेन मी’ हे नाटक पाहून मी भावुक झालो आहे. खूपच कमाल नाटक आहे. म्हातारपणातल्या नात्यांबद्दलची ही एक कथा आहे, कुटुंबातला कुणी एकजण आजारी पडला तर पूर्ण घरावर त्याचा काय परिणाम होतो आणि ते किती सहन करतात, याबद्दलची ही कथा आहे. तसंच एका व्यक्तीच्या आजारपणामुळे इतरांना काय काय सहन करावं लागतं हे या नाटकात पाहायला मिळतं.”
‘असेन मी नसेन मी’ नाटकाचं परेश रावल यांनी केलं कौतुक
यापुढे ते म्हणाले, “हे नाटक संपल्यानंतर अन् पडदा पडल्यानंतरच या नाटकाचा तुमच्यावर प्रभाव पडायला सुरुवात होते. तुमच्या मेंदू आणि मनावर या नाटकाचा परिणाम होतो. नाटक संपल्यानंतरही खूप काळ हे नाटक तुमच्याबरोबर राहतं. तुमच्याबरोबर एक वेगळंच काही घडतंय असं वाटतं राहतं. हाच अनुभव घेण्यासाठी ‘असेन मी नसेन मी’ हे नाटक नक्की बघा.”
दरम्यान, ‘असेन मी नसेन मी’ या नाटकात अमृता सुभाष, नीना कुळकर्णी आणि शुभांगी गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाला आतापर्यंत २४ पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाचे ८ पारितोषिके, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ४ पारितोषिके, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार तसंच झी, माझा आणि मटाचे विशेष पुरस्कारदेखील या नाटकाला मिळाले आहेत.
