सध्या जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार आयफा पुरस्कारांच्या निमित्ताने न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. मोठ्या दिमाखात या सोहळ्याला सुरुवात झाली असून पत्रकार परिषदेनेच या सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी शाहिद कपूर, वरुण धवन, आलिया भट्ट, क्रिती सनॉन, सुशांत सिंग राजपूत या कलाकारांनी पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली होती. पण, यामध्येही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ते अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर.

या पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत व्यासपीठावर उपस्थित बऱ्याच कलाकारांनी आयफा सोहळ्यातील त्यांचे अनुभव शेअर केले. त्यात सर्वाचं लक्ष वेधलं ते म्हणजे दबंग खानने. ‘आयफा पुरस्कार सोहळ्याची धमाकेदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळणार आहे’, असं म्हणत त्याने अनुपम खेर यांना या सोहळ्याच्या निश्ति तारखा विचारल्या. त्याच्या या तारखा विचारण्याच्या अंदाजाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यावर पुढे बोलताना सलमान म्हणाला, मला तारखांच्या बाबतीत काही विचारु नका, सध्या मला एकच ‘डेट’ लक्षात आहे. (तो असं म्हणताच सर्वांनी एकच कल्ला केला) त्यावर पुढे सलमान म्हणाला, डेट म्हणजे कतरिनाच्या वाढदिवसाची डेट (तारीख). १६ तारखेला कतरिनाचा वाढदिवस आहे, असं म्हणत त्याने सर्वांनाच कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं गाणं गाण्याची विनंती केली. सर्वांनी कॅटसाठी गाणं गाण्यास सुरुवात करताच सलमाननेही त्यात साथ देत तिच्यासाठी गाणं गायलं. यावेळी कतरिनाच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा होता.

कतरिना आणि सलमान एकेकाळी बी- टाऊनमधल्या बहुचर्चित कपल्सच्या यादीत गणलं जात होतं. पण, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला. सध्याच्या घडीला या दोघांमध्येही मैत्रीचं नातं कायम असून येत्या काही दिवसांत ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून ते दोघं पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. दरम्यान, या सुपरहिट कलाकारांच्या आयफा सोहळ्यांमधील परफॉर्मन्सकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यंदाचा आयफा बऱ्याच कारणांनी चर्चेत असून, संगीतकार ए.आर. रेहमानला त्याच्या योगदानासाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक एक खास परफॉर्मन्स समर्पित करणार आहेत.