हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘खान’दान नेहमीच चर्चेत असतं. आता तुम्ही म्हणाल हे ‘खान’दान म्हणजे नेमकं काय, तर बी- टाऊनमध्ये अभिनेता सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख सर्रासपणे ‘खान’दान असा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून या खानदानामधील नात्यांचे सुरेख बंध पाहायला मिळत आहेत. जोधपूर न्यायालयाने सलमानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर चाहत्यांसोबतच कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्याच्या बाजूने उभा राहिला. अवघ्या दोन दिवसांचा कारावास भोगल्यांतर सलमानचा जामीन अर्जही न्यायालयात मंजूर झाला. ज्यानंतर तो लगेचच मुंबईत परतला.

सलमानसोबत या कठिण प्रसंगात त्याच्या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. अलविरा आणि अर्पिता या दोघींनीही आपल्या भावाची साथ सोडली नव्हती. सलमान कारागृहातून सुटल्यावर अर्पिताने सोशल मीडियावर त्याच्या फोटोसह एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने भावाप्रतीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. अर्पिता आणि सलमानच्या नात्याविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. ती सलमानची सर्वात लाडकी बहिण असून, अनेकदा या भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

अर्पिताने केलेली ही पोस्टसुद्धा सध्या त्याचंच एक उदाहरण ठरतेय. ‘माझी ताकद, माझा गर्व, माझा आनंद, माझं आयुष्य आणि माझं जग… तू जणून देवाचाच दूत आहेस’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं. एक बहिण आपल्या भावासाठी जी मागणी देवाकडे मागते तिच अर्पिताने या पोस्टमध्ये लिहिली आहे. सर्व नकारात्मक शक्ती आणि इर्ष्या सलमानच्या आयुष्यातून निघून जाव्यात आणि त्याच्या आयुष्यात फक्त आनंदाचाच शिडकाव व्हावा अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. येत्या काळात तुझी कामगिरी आणखी तेजस्वी होवो आणि तुला यश मिळो अशीच मी प्रार्थना करते, असं लिहित अर्पिताने ही पोस्ट केली. तिचे हे शब्द आणि भावाप्रती असणारी काळजी, प्रेम पाहून चाहत्यांनाही या भाऊ- बहिणीच्या जोडीचा हेवा वाटतो आहे. अर्पिताने सलमानच्या सर्व चाहत्यांचेही आभार मानले आहेत. चाहत्यांचं प्रेम आणि त्यांनी दाखवलेला विश्वास पाहता आपण सदैव त्यांचे आभारी असल्याचं तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र