scorecardresearch

Tubelight : ट्विटरवर सलमानच्या ‘ट्युबलाइट’चा लखलखाट

दबंग खानचं हे रुप तुम्ही पाहिलं का?

salman khan
ट्युबलाइट

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान लग्न कधी करतो या चर्चा आता शमल्या असल्या तरीही हा ‘दबंग’ अभिनेता मात्र या- ना त्या कारणामुळे नेहमीच प्रकाशझोतात असतो हे नाकारता येणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये सलमान ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ईदच्या मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच त्यातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘रेडिओ साँग’ प्रदर्शित करण्यापूर्वी ‘ट्युबलाइट’च्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला असणार यात शंकाच नाही. कारण, या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानचं खास इमोजी आता ट्विटरवर वापरता येणार आहे. ‘ट्युबलाइट’चा दिग्दर्शक कबीर खाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देत ‘तो’ इमोजीही वापरून दाखवला आहे. ‘मला हे सांगताना फार आनंद होत आहे की, ‘ट्युबलाइट’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे ज्याचं कॅरेक्टर इमोजी आहे.’ असं ट्विट कबीरने केलं. सलमाननेही कबीरचं ट्विट रिट्विट करत चाहत्यांना एक छोटीशी भेट दिली असं म्हणायला हरकत नाही. गळ्यात बूट अडकवलेला सलमानचा हा इमोजी आता बरेचजण त्यांच्या ट्विटमध्ये वापरत आहेत.

दरम्यान, सलमानच्या या आगामी चित्रपटातील ‘रेडिओ साँग’ हे गाणंही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं एकंदर चित्रीकरण पाहता पुन्हा एकदा गतकाळात गेल्याची अनुभूती होत असल्याचं म्हटलं जात आहे. या गाण्यामध्ये आणि एकंदर चित्रपटामध्येच १९६० दरम्यानचा काळ साकारण्यात आला आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर इतक्या कलाकारांच्या फौजफाट्यासह हा काळ साकारणं ‘ट्युबलाइट’च्या दिग्दर्शकांसाठीही आव्हानात्मक असणार आहे, असंच म्हणावं लागेल. ‘कोईमोई’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या गाण्यामध्ये तब्बल १००० डान्सर्सचा सहभाग आहे.

भाईजान सलमानच्या या चित्रपटामध्ये अभिनेता सोहेल खान, चिनी अभिनेत्री झू झू, बालकलाकार माटिन रे तंगू झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली असून हा बहुचर्चित चित्रपट २३ जुलैला ईदचं औचित्य साधत प्रदर्शित होणार आहे असं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-05-2017 at 14:56 IST