अभिनेता शाहरूख खान केवळ त्याच्या चाहत्यांच्याच गळ्यातील ताईत आहे, असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. कारण बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही शाहरूखचे चाहते आहेत. अशा या लाडक्या किंग खानचा २ नोव्हेंबरला वाढदिवस असून, तो ५२ वर्षांचा होतोय. किंग खानच्या आयुष्यातील या खास दिवसाच्या सेलिब्रेशनला त्याच्या अलिबागच्या फार्महाऊसवर सुरुवात झाली असून बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी या खास सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
सध्या सोशल मीडियावर किंग खानच्या अलिबाग फार्महाऊसवर पार पडलेल्या या पार्टीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या या पार्टीला इंडस्ट्रीतील काही खास मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, फराह खान, करण जोहर, कतरिना कैफ या कलाकारांनी कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि मुलगा अब्रामही मोठ्या उत्साहात होते. सुहानाच्या मैत्रीणींनीसुद्धा किंग खानच्या वाढदिवसानिमित्त आयेजित करण्यात आलेल्या या पार्टीला हजेरी लावली होती.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
पार्टीमध्ये नेमका काय आणि कसा कल्ला झाला, हे चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फराह खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोमधीलच एका फोटोने सर्वांचे लक्ष वेगले. कारण, खुद्द किंग खान फराह आणि करणचा फोटो काढताना दिसत आहे. तिने हा फोटो पोस्ट करत त्यासोबत सुरेख कॅप्शनही दिले, ‘एका निष्णात छायाचित्रकाराकढून छायाचित्र काढून घेण्याचा योग दररोज येत नाही…’ असे म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये तिने करण जोहर आणि शाहरुखलाही टॅग केले. फराहव्यतिरिक्त करण जोहर, गौरी खाननेही किंग खानच्या बर्थडे पार्टीतील काही फोटो पोस्ट केले.