बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षभरापासून कोविड काळात ज्यांचे नुकसान झाले आहे त्या लोकांची मदत करताना दिसत आहे. त्याच्या या कार्यामुळे तो सतत चर्चेत आहे. सोनूने हजारपेक्षा अधिक लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहचण्यास, वैद्यकीय सुविधा, इतर गरजांसाठी आणि त्यांना काम मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. गेल्या आठवड्यात आयकर विभागाने या अभिनेत्याच्या घरावर छापा टाकला होता. सोनू सूदवर कर चुकवला असल्याचा आरोप होता, त्याच्या घरीही चौकशी जवळ-जवळ तीन दिवस सुरू होती.

या चौकशी नंतर सोनूने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट जाहीर केले. “प्रत्येक वेळेस आपल्याला आपली बाजू मांडायची गरज नाही… माझ्या फाऊंडेशनमध्ये येणारा प्रत्येक रुपया हा गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी वापरला जातो”, असे त्या स्टेटमेंटमध्ये लिहिले होते. आयकर विभागाचा असा दावा आहे की सोनू सूदने १८ कोटी रुपये जमा केले होते त्यातील फक्त १.९ कोटी रुपये मदत कार्यासाठी वापरण्यात आले आहेत आणि उर्वरित रक्कम अद्यापही वापरली गेली नाही. त्यांच्या या आरोपाला उत्तर देत त्याने सांगितले, त्याला दररोज हजारो विनंत्या येत असल्याने गरजूंना मदत करण्यासाठी पैसे वापरण्यास त्याला कधीच वेळ लागणार नाही. शनिवारी सोनूने एक स्क्रीन शॉट ट्वीट केला होता. “उम्मीद.. विश्वास.. आणि आशिर्वाद! अजून आयुष्यात काय हवे”, असे त्या ट्वीट मध्ये लिहिले होते. सोनूने शेअर केलेला स्क्रीनशॉट हा त्याच्या मेलबॉक्सचा होता ज्यात ५२,००० पेक्षा अधिक ईमेल आहेत.

छाप्यानंतरच्या स्टेटमेंटमध्ये सोनूने म्हणाला, माझ्या फाऊंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचण्यासाठी, गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी वापरला जातो. मी वेळोवेळी अनेक ब्रॅंडना या कार्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करत असल्याने गेल्या चार दिवसांपासून मी तुमची सेवा करु शकलो नाही, पण मी तुमच्या सेवेसाठी पुन्हा तयार आहे.”