scorecardresearch

“तुम्ही माझं रेटिंग बदललं, मन नाही”, छपाक चित्रपटाला डाऊनवोट करणाऱ्यांना दीपिकाचं उत्तर

जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याचा परिणाम छपाक चित्रपटासोबत आयएमडीबी रेटिंगवरही पहायला मिळाला होता

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन गेल्या काही दिवसांपूर्वी ‘छपाक’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत होती. मात्र चित्रपटापेक्षाही जास्त जेएनयूमधील आंदोलनात हजेरी लावल्याने तिची चर्चा जास्त रंगली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जेएनयूमध्ये गेल्याने तिच्यावर काहीजणांनी टीका करत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु केली. जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याचा परिणाम तिच्या चित्रपटासोबत इंटरनेट मूव्ही डेटाबेसच्या (आयएमडीबी) रेटिंगवरही पहायला मिळाला. आयएमडीबी छपाक चित्रपटाला मोठ्या प्रमाणात डाऊनवोट करण्यात आलं.

दरम्यान दीपिकाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दीपिका तिच्यावर टीका करणाऱ्यांना तसंच द्वेष करणाऱ्यांना उत्तर देताना दिसत आहे. “त्यांनी माझं रेटिंग बदललं, मन नाही,” असं दीपिका या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

चित्रपट आणि टीव्ही शोजचे रेटिंग देणाऱ्या जगातील सर्वात प्रतिष्ठित वेबसाइट आयएमडीबीवर सुरुवातीला छपाक चित्रपटाला अनेकांनी वन स्टार रेटिंग दिलं होतं. पण नंतर हे रेटिंग घसरुन ४.४ वर पोहोचलं आणि अखेर ४.६ वर स्थिरावलं. समीक्षकांनी चित्रपटाला चांगले रिव्ह्यू दिले असून दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट एका अॅसिड हल्ला पीडितेच्या आय़ुषयाची गोष्ट आहे.

छपाक चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. चित्रपटात मालती या तरुणीचं अॅसिड हल्ल्यानंतरचं आयुष्य दर्शवण्यात आलं आहे. चित्रपट लक्ष्मी अग्रवाल या अॅसिड हल्ला पीडितेच्या आयुष्यावर आधारित आहे. छपाक चित्रपटासोबत अजय देवगणचा तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तान्हाजीने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली असून छपाकने जास्त कमाई केली नसली तरी प्रेक्षकांवर आपला प्रभाव सोडला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actress deepika padukone chhapak imdb downvote rating jnu sgy