बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या असून तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. रविवारी यामुळेच जॅकलिनला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जॅकलिन दुबईला एका कार्यक्रमासाठी जात होती. यावेळी तिची चौकशी करण्यात आली तसंच दिल्लीमध्ये तपास यंत्रणेसमोर हजर राहावं लागेल असं सांगण्यात आलं.

दिल्लीमधील कार्यालयात हजर होण्यासाठी ईडी नव्याने जॅकिलनला समन्स जारी करणार आहे.

ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरोधात २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ७००० पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. तिहार जेलमध्ये असताना त्याने एका उद्योजकाच्या पत्नीकडून २०० कोटींची वसूली केल्याचा आरोप आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आहेत.

त्यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही बोललं जात असून त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.

याआधी नोरा फतेहीच्या प्रतिनिधीने ती एक पीडित असल्याचा दावा केला होता. नोरा फतेही तपासात सहकार्य करत असल्याचं सांगताना त्यांनी म्हटल होतं की, “नोरा आरोपीला ओळखत नव्हती किंवा तिचे त्याच्याशा काही संबंधही नव्हती. तपासात सहकार्य करण्यासाठी तिला बोलावण्यात आलं आहे”.