कर्नाटकमधील हिजाब वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटलं. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण करणाऱ्या कंगना रणौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. कंगना रणौतने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “इराण. १९७३ आणि आता. पन्नास वर्षात बिकिनीपासून ते बुरख्यापर्यंत. जे इतिहासापासून धडा घेत नाहीत ते इतिहासाची पुनरावृत्ती करतात”.
कंगनाने हा फोटो कॅप्शनसहित शेअर करताना लिहिलं आहे की, “जर तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालून दाखवा. मुक्त होण्यास शिका, स्वत:ला पिंजऱ्यात अडकवू नका”.
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.
कॉलेजला न जुमानता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असं न्यायालयाने म्हटलं. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणादेखील केली होती.
कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादात भाजपा आमदार रेणुकाचार्य यांनी नवा वाद निर्माण केला आहे. महिलांच्या कपड्यांमुळे बलात्कार वाढत असल्याचे त्यांनी सांगितलं. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी बिकिनी घालण्याच्या अधिकाराबाबत ट्विट केल्यानंतर भाजपा आमदाराने हे वक्तव्य केलं आहे.
बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो की हिजाब असो, तिने काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय संविधानाने संरक्षित केला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.