अनुराग कश्यपला अटक करा, कंगनाची मागणी

“पायल घोषने जे आरोप केले आहेत ते करण्यात अनुराग कश्यप समर्थ आहे”

अभिनेत्री पायल घोषने केलेल्या गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहे. अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पायल घोषने केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पायल घोषच्या समर्थनार्थ पुढे आली असून अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. पायल घोषने ट्विटरच्या माध्यमातून अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. पायल घोषचं ट्विट रिट्विट करत कंगनाने आपला पाठिंबा दर्शला असून अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी केली आहे.

कंगनाने एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत. बॉलिवूडमध्ये नवीन लोकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असून अनुराग महिलांना त्रास देऊ शकतो असं तिने म्हटलं आहे. “पायल घोष जे दावे करत आहे ते अनुराग कश्यप करु शकतो, तो सक्षम आहे. त्याने आपल्या अनेक पार्टनर्सची फसवणूक केली आहे. अनुरागने पायलसोबत जे केलं आहे ते बॉलिवूडमध्ये नित्याचं झालं आहे. स्ट्रगल करणाऱ्या इंडस्ट्रीतील बाहेरील मुलींना सेक्स वर्करप्रमाणे वागणूक दिली जाते,” असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पायल घोषचा आरोप काय?
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप
“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actress kangana ranaut support to payal ghosh demands arrest of anurag kashyap sgy

ताज्या बातम्या