‘धूम ३’ या चित्रपटाची संपूर्ण टीम आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली. पण, हा चित्रपट ‘धूम ४’ वगैरे असेल असा अंदाज लावण्यास तुम्ही सुरुवात केली असेल तर तसं नाहीये. ही टीम एकत्र आलीये ती म्हणजे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी. अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य आणि ‘यशराज फिल्म्स’ या त्रिकुटामध्ये ‘धूम ३’मधील आणखी एका व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. ती म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी कतरिनाची निवड झाली असल्याची माहिती आमिरनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.
‘अखेर आम्हाला आमची शेवटची ‘ठग’ मिळाली… कतरिना कैफचं मी स्वागत करतो’, असं ट्विट करत आमिरने तिचं ‘ठग्स….’च्या टीममध्ये स्वागत केलं आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्य मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही झळकणार असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर ठरत आहे.
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी कलाकारांची शोधमोहिम संपली असून १ जूनपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर विजय कृष्ण आचार्य यांचे हे ‘ठग्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ अ ठग’ या पुस्तकावर आधारित असून त्यातून एका वेगळ्या जगताची सफर घडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Finally we have our last thug….. Katrina ! Welcome aboard Kat 🙂
— Aamir Khan (@aamir_khan) May 11, 2017
#ThugsOfHindostan has its final ‘thug’ onboard: Katrina Kaif joins the cast… Costars Amitabh Bachchan, Aamir Khan and Fatima Sana Shaikh.
— taran adarsh (@taran_adarsh) May 11, 2017
‘ठग्स…’च्या निमित्ताने आमिर आणि कतरिनाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत नाहीये. याआधी त्यांनी ‘धूम ३’मध्ये स्क्रिन शेअर केली होती. तेव्हा आता ‘ठग्स….’मध्ये कतरिना कोणत्या भूमिकेत दिसणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. सध्या ती ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून, या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकणार आहे.