scorecardresearch

“बॉयकॉट प्रकाराला माझं समर्थन…” अभिनेत्री मंदाकिनीने बॉयकॉट गॅंग आणि घराणेशाहीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

मंदाकिनी आता तिच्या मुलासह एका म्युझिक व्हिडिओमधून पुन्हा पदार्पण करणार आहे.

“बॉयकॉट प्रकाराला माझं समर्थन…” अभिनेत्री मंदाकिनीने बॉयकॉट गॅंग आणि घराणेशाहीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत
मंदाकिनी | mandakini

बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी ही अजूनही सगळ्यांच्या चांगलीच लक्षात आहे. १९८५ साली ‘मेरे साथी’ या चित्रपटातून मंदाकिनीने पदार्पण केलं होतं. या चित्रपटापेक्षा तिचं नाव दुसऱ्या म्हणजेच ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे चर्चेत आलं. राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात मंदाकिनीने राजीव कपूरबरोबर महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिने दिलेल्या बोल्ड सीन्सचीच चर्चा अधिक रंगली होती.

या चित्रपटानंतरही मंदाकिनी फारशी चित्रपटात दिसली नाही. तिने केलेल्या बऱ्याच चित्रपटांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. अचानक एके दिवशी डॉन दाऊदबरोबरचे तिचे क्रिकेटच्या स्टेडियममधले फोटो झळकले आणि रातोरात तिची करकीर्दही संपुष्टात आली. आता मंदाकिनी पुन्हा मनोरंजनसृष्टीकडे वळली आहे.

मंदाकिनी आता तिच्या मुलासह एका म्युझिक व्हिडिओमधून पुनरागमन करणार आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मंदाकिनीने बॉयकॉट प्रकार आणि घराणेशाही यावर आपले विचार मांडले आहेत. मंदाकिनी म्हणते, “मी या बॉयकॉटचं अजिबात समर्थन करत नाही. कित्येक कलाकार, तंत्रज्ञ यांची मेहनत यासाठी पणाला लागलेली असते. लोकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला हवेत. कलाकार हा नेहमीच कलाकारच असतो, आणि तो जे करतो ते लोकांच्या मनोरंजनाखातर करतो.”

मंदाकिनीच्या दुसऱ्याच चित्रपटात एका स्टारच्या मुलाला मुख्य भूमिका दिली होती. त्यामुळे घराणेशाहीबद्दल विचारल्यावर ती म्हणते, “माझ्यामते घराणेशाही ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. अभिनेत्यांची मुलं त्याच वातावरणात वाढतात, त्यामुळे त्यांना आपल्या पालकांप्रमाणेच काम करावंसं वाटणं ही साहजिक आहे. ती मुलं सेटवर, शूटिंगच्या ठिकाणी येतात. त्यांची बऱ्याच दिग्दर्शकांशी ओळख होते. त्यामुळे आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यात काही गैर नाही असं मला वाटतं!”

आणखी वाचा : चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर कुटुंबासह अक्षय कुमार लंडनला रवाना, पत्नी परदेशातच राहणार कारण…

१९९६ च्या ‘जोरदार’ या चित्रपटात मंदाकिनी शेवटची दिसली होती. नंतर तिने या फिल्मी दुनियेपासून फारकत घेतली होती. आता पुन्हा ती या मनोरंजनविश्वात यायचं ठरवत आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने आपल्या मुलाला देखील पुढे आणलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actress mandakini express her thoughs about boycott culture and nepotism avn

ताज्या बातम्या