scorecardresearch

बाबा राम रहिम यांच्या समर्थकांनी मला धमकावलं होतं, ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

तिने बाबा राम रहिम यांच्यावर टीका केली होती.

बाबा राम रहिम यांच्या समर्थकांनी मला धमकावलं होतं, ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा
ट्विंकल खन्ना, बाबा राम रहिम सिंग

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत बाबा राम रहिम सिंग यांच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. डेऱ्यातील साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्या राम रहीम यांच्याबद्दल अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही एक खुलासा केलाय. राम रहीम यांच्या समर्थकांद्वारे आपल्याला धमकावण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट ट्विंकलने केल्याचं म्हटलं जातंय.

राम रहिम यांचा ‘एमएसजी’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळी ट्विंकल त्यांना फॉलो करायची. इतकच काय, तर त्यांनी मुंबईत ज्यावेळी घर घेतलं होतं तेव्हाही तिने यासंदर्भातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतरच ट्विंकलला राम रहिम यांच्या समर्थकांकडून धमक्या देण्यात येऊ लागल्या. ट्विंकलने उघड केल्यानुसार हे सर्व पहिल्यांदाच घडलं नव्हतं.

पाहा : Video : ‘असा’ तोडला राम रहिम यांच्या खोलीचा दरवाजा

ट्विंकलने याआधीसुद्धा तिच्या ब्लॉगमधून राम रहिम यांच्यावर टीका केली होती. तेव्हासुद्धा तिला त्यांच्या समर्थकांनी तोंड बंद ठेव अशी धमकी दिली होती. ट्विंकलने जानेवारी महिन्यात केलेल्या एका ट्विटमध्ये नाव न घेता राम रहिम यांच्याविषयीचं ट्विट केलं होतं. इतकच नव्हे तर तिने, आपल्या ब्लॉगमधूनही भोंदूगिरी करणाऱ्या बाबांवर शाब्दिक हल्ला चढवला होता.

या ब्लॉगमध्ये तिने लिहिलेलं, ‘एमएसजी’चा ट्रेलर पाहून मी इतकी प्रभावित झाले की त्यानंतर मी एमएसजी क्लब सुरु केला. अक्षयचा ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘एमएसजी : द लायनहार्ट २’ जेव्हा एकाच वेळी प्रदर्शित होणार होते, तेव्हा कोणता चित्रपट पाहायचा हे मी निश्चत केलं होतं. अनेकांना विनंती केल्यानंतर अखेर माझ्या तीन मैत्रिणींनी चित्रपट पाहण्यासाठी होकार दिला.’ ट्विंकलने हे सर्व उपरोधिक लिहिलं होतं. सोशल मीडियावर तिच्या या ब्लॉगच्या बऱ्याच चर्चाही झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-08-2017 at 19:25 IST

संबंधित बातम्या