चीनपासून फैलाव झालेल्या करोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. देशातील काही नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. अलिकडेच लोकप्रिय गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तिचे चारही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्येच आता अभिनेत्री काजोल आणि तिची लेक न्यासा या दोघींना करोना झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. याविषयी अभिनेता अजय देवगणने ट्विट करत सत्य परिस्थिती सांगितली आहे.

सध्या सोशल मीडियावर करोनाशी निगडीत अनेक मेसेज फिरत आहेत. यामध्ये काही अफवांचाही समावेश आहे. अशीच अफवा काजोल आणि न्यासा यांच्याविषयी पसरली. काजोल आणि न्यासाला करोना झाल्याची चर्चा चाहत्यांमध्येच चांगलीच जोर धरु लागली होती. मात्र आता त्यावर अजयने ट्विट करत या दोघींनाही करोना झाला नसल्याचं सांगितलं आहे.


‘काजोल आणि न्यासाच्या प्रकृतीची चौकशी केल्यामुळे साऱ्यांचे आभार. पण काजोल आणि न्यासा दोघीही ठीक आहेत. त्यांच्याविषयी पसरत असलेली माहिती ही चुकीची, निरर्थक आणि बिनबुडाची आहे. त्यांच्याविषयी अफवा पसरत आहेत’, असं ट्विट अजय देवगणने केलं.

दरम्यान, न्यासा ही विदेशात शिक्षण घेत असून काही दिवसापूर्वीच ती सिंगापूरमधून भारतात परतली होती. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यांच्या शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे न्यासा मुंबईत परतली. न्यासा परत आल्यावर तिला आणि काजोलला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळे त्यांचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते.  त्यानंतर या दोघींना करोना झाल्याची अफवा पसरली होती. सध्या चित्रपटांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे काजोल आणि अजय घरीच आहेत.