अमेरिकेमध्ये गाजत असलेल्या ‘क्वांटिको’ मालिकेतील अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रियांका चोप्राने पाकिस्तानात जाण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानसोबत भाईचार निर्माण करण्याचा विचार प्रियांकाने नुकताच बोलून दाखविला. उरी हल्ल्यानंतर पाक कलाकारांची घरवापसी झाल्यानंतर प्रियांकाने पाक कलाकारांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर भाष्य करत पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले.’पाकिस्तानमध्ये मला अतिशय प्रेम मिळत असल्याने मी या ठिकाणी जाण्यास आजही तयार आहे.’ अशी इच्छाही प्रियांकाने यावेळी व्यक्त केली.

पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार आणि निर्माता दिग्दर्शकांनी याचा विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ट्विटर आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाविश्वातील मंडळींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मनसेने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ‘इम्पा’नेही भारतात पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घातली होती. पाकिस्तानी कलाकारांविषयीचा हा वाढता विरोध पाहता करण जोहरच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटावरही टांगती तलवार आली आहे.
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीन ताणले असताना प्रियांकाने पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेली ही मुलाखत बॉलिवूड जगतामध्ये वादळ निर्माण करु शकते. अमेरिकेतील लोकप्रिय मालिका ‘क्वांटिको २’ मध्ये सध्या प्रियांका मुख्य भूमिकेत दिसत आहे.