२० मार्च २०२० या तारखेची देशाच्या इतिहासात नोंद केली जाईल. आज (शुक्रवारी) पहाटे ५.३० वाजता निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात आलं. सात वर्षांच्या लढ्यानंतर अखेर निर्भयाला आणि तिच्या आई-वडिलांना न्याय मिळाला. २०१२ मध्ये निर्भयासोबत घडलेल्या प्रकरणानंतर देशात संतापाची एक लाट उसळली होती. मात्र आज निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. यामध्येच बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणी भाष्य केलं आहे.

बरेचसे बॉलिवूड सेलिब्रिटी समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे भाष्य करत असतात. यामध्ये निर्भया प्रकरणी कलाविश्वातील काही कलाकार व्यक्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या या सेलिब्रिटींच्या ट्विटचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन, तापसी पन्नू, रितेश देशमुख, प्रिती झिंटा, कुणाल कोहली या कलाकारांनी ट्विट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुष्मिता सेननेदेखील ट्विट करत न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत.

“निर्भयाला न्याय मिळाला. निर्भयाचे कुटुंबीयांसोबत आणि मित्र-परिवारासोबत मी आहे. या निर्णयाची खूप वाट पाहावी लागली. मात्र जो निर्णय लागला त्यामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला”, असं रितेश म्हणाला.

निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. मात्र अखेर तिला न्याय मिळाला आहे. त्याचमुळे देशभरात आज आनंदाचं वातावरण आहे.