‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर अश्विनी अय्यर तिवारी लवकरच एका नव्या विषयावर चित्रपट करणार आहे. ‘खेल कबड्डी’ असे म्हणत प्रो-कबड्डी लीगमुळे हा खेळ अनेकांपर्यंत पोहोचला आणि खऱ्या अर्थाने कबड्डीलाही ग्लॅमरस टच मिळाला. क्रिकेटप्रमाणेच हा खेळही अनेकांच्या फेव्हरेट लिस्टचा भाग झाला. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू नावारूपाला आले. अशा या खेळावर अश्विनीचा नवा चित्रपट आधारित असेल.

‘फॉक्स स्टार स्टुडिओज’ने या चित्रपटाच्या निर्मितीचा भार घेतला असून अश्विनी सध्या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत असल्याचे वृत्त ‘स्पोर्ट्सकीडा’ने प्रसिद्ध केले. याविषयीच अधिक माहिती देताना अश्विनी म्हणाली, ‘माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या वियावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. यामध्ये मला रुचा पाठक आणि फॉक्स स्टार स्टुडिओजचीही फार मदत होणार आहे.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘फॉक्स स्टार स्टुडिओज’ने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतल्यामुळे आतापासूनच क्रीडा आणि चित्रपट वर्तुळात चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे आता या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये खेळांवर आधारित चित्रपटांकडे जास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कबड्डीचा थरारसुद्धा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे क्रीडा आणि चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

वाचा : प्रो कबड्डीच्या किमयागाराची ८१.७५ लाख कमाई