सध्या हिंदी चित्रपटावर खासकरून बॉलिवूडवर सारा देश नाराज आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळेच प्रेक्षक त्यांचं बॉलिवूडबद्दलचं मत व्यक्त करत आहेत. घसरलेला दर्जा आणि इतर कारणांमुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येत नसल्याने सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नुकताच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीला भेटल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खुद्द अमित शहा यांनीच हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटला शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. सिनेक्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातले दोन दिग्गज एकमेकांची भेट घेत असल्याने सगळीकडेच चर्चा होऊ लागली आहे. या फोटोमध्ये अमित शहा आणि रोहित शेट्टी यांच्यात कोणत्यातरी गंभीर विषयावर चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे.

असं म्हंटलं जात आहे की रोहित शेट्टीने बॉयकॉट ट्रेंड संदर्भात अमित शहा यांची भेट घेतली आहे. येणाऱ्या काळात चित्रपटाला नुकसान होऊ नये म्हणून रोहितने थेट गृहमंत्र्यांची भेट घेऊन काही तोडगा काढण्यासाठी रोहितने भेट घेतल्याचं म्हंटलं जात आहे. शिवाय उत्तरप्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणावर चित्रपटसृष्टीच्या निर्माणाचं काम सुरू असल्याने मुंबईतली कलाकार मंडळी अस्वस्थ आहेत. यावरसुद्धा तोडगा काढता यावा यासाठी बरेच मोठे कलाकार सध्या राजकीय नेत्यांची भेट घेत असल्याच्या चर्चा रंगतान दिसत आहेत.

आणखी वाचा : ईशान खट्टरने केलेलं कौतुक ऐकून करण जोहर म्हणाला, “माझ्याकडे त्या नजरेने कुणी बघतच नाही”

अमित शहा सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त दौऱ्यासाठी आले आहेत. मध्यंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. शिवाय रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. रणवीर सिंग यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच रोहितच्या वेबसीरिजचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉयसारखे कलाकार या सीरिजमध्ये दिसणार असून ही सीरिज मुंबई पोलिस फोर्सच्या कारवायांवर बेतलेली असेल.