‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’, ‘देव डी’ आणि ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ असे क्लासिक चित्रपट दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. आज १० सप्टेंबर रोजी अनुरागचा ४७वा वाढदिवस आहे. अनुरागने त्याच्या दिग्दर्शनाच्या करिअरची सुरुवात ‘पांच’ या चित्रपटापासून केली. परंतु दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

अनुराग कश्यपचा जन्म उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे झाला. त्यानंतर तो बनारस, ग्वालियर, दिल्लीमध्ये फिरुन अखेर मुंबईमध्ये स्थायिक झाला. अनुरागला दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला कलाविश्वात आणण्याचे श्रेय दिले जाते. बऱ्याच वेळा अनुराग त्याच्या चित्रपटांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनुरागचे बॉलिवूड अभिनेत्यांसोबत देखील वाद झाल्याच्या चर्चा होत्या.

‘तेरे नाम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अनुराग यांच्यामधील वाद विशेष गाजले होते. त्यांच्यातील वादामुळे अनुरागला ‘तेरे नाम’ चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सलमान आणि अनुरागचे सतत वाद होत असल्याचे खुद्द अनुरागने सांगितले होते.

‘तेरे नाम’ चित्रपटाचे हक्क रामगोपाल वर्मा यांनी विकत घेतले होते. या चित्रपटाची कथा अनुराग कश्यप लिहित होता. चित्रपटात सलमानने संजय कपूरला रिप्लेस केले होते. अनुरागला चित्रपटात सलमानला यूपीच्या मुलच्या भूमिकेत दाखवायचे होते. त्यासाठी त्याने सलमानला त्याच्या छातीवरील केस वाढवण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुरागला चित्रपट निर्मात्यांनी फोन करुन ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि तो या चित्रपटाचा भाग नसल्याचे सांगितले होते.

सलमान आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपचेही भांडण झाले होते. अभिनवने सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दबंग’ दिग्दर्शित केला होता. ‘दबंग’नंतर ‘दबंग २’देखील अभिनव कश्यप दिग्दर्शित करणार होता. मात्र झालेल्या वादांमुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी अरबाज खानच्या हातात दिग्दर्शनाची धूरा देण्यात आली.