‘खुबसूरत गर्ल’ सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ट्विटरवर यावेळी सोनम चर्चेत येण्याचं कारण आहे एका वृत्तपत्रामध्ये तिने लिहिलेला ब्लॉग. सोनमने लिहिलेल्या या ब्लॉगमुळे ती अडचणीत आली आहे. ‘तुम्ही मला बिंबो किंवा काहीही म्हणू शकता. पण, तुम्हाला माहितीये का.. मी एक अत्मविश्वासू महिला आहे. मला माहितीये, स्वत:चे विचार मांडण्याइतकी मी सक्षम आहे.’ असं तिने या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं.
तिच्या या ब्लॉगमधील काही ओळींनी अनेकांचं लक्ष वेधलं. पण, यावेळी लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे टीका करत तिची खिल्ली उडवण्यासाठी. ‘मला माझा देश आवडतो. पण, मी केवळ प्रश्न विचारते आणि टीका करते म्हणून तुमच्यासारख्या धर्मांध लोकांच्या नजरेत राष्ट्रविरोधी ठरते. तुम्हाला राष्ट्रगीत पुन्हा एकदा ऐकण्याची गरज आहे. लहान असताना तुम्ही एक ओळ म्हटली असेल, ‘हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई….’ आठवतंय.’ इथे सोनम राष्ट्रगीताविषयीची ओळ आणि बालपणीच्या आठवणीच्या ओळीच्या शेवटी तिने पूर्णविराम दिला होता. पण, ट्विटरवर मात्र या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आणि सोनमची अनेकांनी खिल्ली उडवली.
वाचा : मी सरकारवर टीका करु शकत नाही का?- सोनम कपूर
या सर्व प्रकारांतर त्याविषयी उत्तर देत सोनमने तिच्या ब्लॉगला इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल ट्विटरचे आणि खिल्ली उडवणाऱ्यांचेही आभार मानले. सोनमच्या या ब्लॉगचा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्यामुळे हा सर्व प्रकार घडला.