फ्लॅशबॅक : दादांशी भेट आणि जगदीपचा आनंद…

जगदीपसाठी हे सगळेच आनंददायक होते.

दादांचा संगीताचा कान खूपच चांगला असल्याने त्यांनी हे गाणे समजून घेऊन छोटीशी प्रतिक्रिया देखील दिली.

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण दादा कोंडके यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळेस म्हणजेच त्याच शुक्रवारी मुंबई-पुण्यात तरी आपला चित्रपट प्रदर्शित करायचा नाही अशीच हिंदी चित्रपटाचे निर्माते-वितरक-प्रदर्शक विशेष काळजी घेत. ‘बॉक्स ऑफिस’वर हुकमी ‘दादा’गिरी करणार्‍याला आपल्या हिंदी चित्रपटातून संधी देण्यास हिंदीतील निर्माता-दिग्दर्शकांनी विशेष उत्सुकता दाखवलीच तर त्यात आश्चर्य ते काय? मनमोहन देसाई यांनी ‘कुली’ (१९८३) वेळेस केलेला प्रयत्न साध्य झाला नाही म्हणून इतरांनी प्रयत्न करणे सोडणे असे हिंदी चित्रपटसृष्टीत घडत नाही. ते खूपच चिवट व व्यावसायिक आहेत. तसाच एक जगदीप. एकेकाळचा हा हीरो कालांतराने कॉमेडियन झाला. सत्तरच्या दशकात त्याने भरभरून विनोदी भूमिका केल्या. आणि ऐंशीच्या दशकात त्यालाही वाटले की आपणही इतर काही विनोदवीरांसारखे ‘एक पाऊल पुढे’ टाकत एखाद्या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन करावे.

आता असा एखादा कॉमेडियन चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दोन गोष्टी स्पष्ट असतात. एक म्हणजे तो त्या चित्रपटाचा ‘नायक’ असतो व दुसरे म्हणजे तो अनेक स्टार्सना पाहुण्या भूमिकेत दाखवतोच. मेहमूदचा ‘कुँवारा बाप’, असरानीचा ‘चला मुरारी हीरो बनने’ ही उदाहरणे पुरेशी आहेत. जगदीप मुळचा भोपाळचा म्हणून त्याने ‘सूरमा भोपाली’ (१९८८) या चित्रपटाची निर्मिती केली. त्याचे शक्य तेवढे भोपाळलाच चित्रीकरण केले. तर धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, रेखा या प्रत्येकाच्या तारखेनुसार मुंबईत केले. ते त्याने अधिकाधिक प्रमाणात केल्याचे चित्रपटात जाणवते.

दादा कोंडकेंचीही तारीख हवी होती. दादा त्या दिवसात पुणे वा कोल्हापूरला आपल्या मराठी अथवा हिंदी चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी. अधेमधे मुंबईत आपल्या चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगला वा एखाद्या इव्हेंटला येत. जगदीप बिचारा दादांची तारीख मिळेल या आशेवर असे. एकाच चित्रपटात दोन कॉमेडियन एकत्र येणार म्हणजे धमाल वाढणार, दादांच्या हुकमी क्राऊडचाही लाभ होणार असे गणित स्पष्ट होते. अशी व्यावसायिक खेळी चुकीचीही नसतेच. ते जमवणे, जुळवणे खूपच अवघड वाटताच अखेर काय बरे ठरले? तर दादांनी ‘सूरमा भोपाली’च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला हजर राहून खूप खूप शुभेच्छा द्याव्यात.

दादांनी हे फारच आनंदाने केले. दादा कुठेही गेले तरी गप्प बसणाऱ्यातील नव्हतेच. सर्वप्रथम एखादा छान विनोद करीत वातावरण हलके करणार. मग अनेकांची विचारपूस करणार. दादांचा संगीताचा कान खूपच चांगला असल्याने त्यांनी हे गाणे समजून घेऊन छोटीशी प्रतिक्रिया देखील दिली. जगदीपसाठी हे सगळेच आनंददायक होते. तीच त्याची भावना या फोटोत दिसतेय.
दिलीप ठाकूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood flashback actor comedian surma bhopali jagdeep marathi actor comedian dada kondke blog dilip thakur film analysis

ताज्या बातम्या