कलाकारांची फौज नको, गोष्ट हवी

जगातील सर्वात मोठा चित्रपटउद्योग म्हणून बॉलीवूडकडे पाहिले जाते.

|| स्वप्निल घंगाळे

जगातील सर्वात मोठा चित्रपटउद्योग म्हणून बॉलीवूडकडे पाहिले जाते. बॉलीवडूमध्ये वर्षांला हजारो चित्रपट तयार होऊन प्रदर्शित केले जातात. त्यापैकी काही विक्रमी वाटचाल करतात तर काही लगेच आपटतात. याच आपटणाऱ्या चित्रपटांमध्ये आता अनेक मल्टीस्टारर म्हणजेच दोनहून अधिक बडे कलाकार असणारे चित्रपट दिसू लागले आहेत. मल्टीस्टारर चित्रपट आपटण्याचे प्रमाण वाढले असून अशा पडेल चित्रपटांचा इतिहास मोठा आहे. या पडेल चित्रपटांच्या यादीत आता ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘कलंक’ यांचाही समावेश झाला आहे. हे असे  का होते? त्यामागील कारणे आणि इतिहास यावर एक दृष्टीक्षेप..

आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘कलंक’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र इतकी तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट ना प्रेक्षकांना आवडला ना चित्रपट विश्लेषकांना. असं का झालं? तर यामागील कारण आहे चित्रपटाची कथा. कथा चांगली असेल तर अगदी नवख्या कलाकारांचा चित्रपटही प्रेक्षक डोक्यावर घेतात या उलट अगदी सलमान खान असो किंवा शाहरुख खान चित्रपटाताल जर कथाच नसेल तर प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. असचं काहीसं आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चंही झालं. चित्रपटात दिग्गज कलाकार असूनही भरकटत जाणारी कथा प्रेक्षकांना नकोशी झाली. ही दोन ताजी उदाहरणे आहेत. मात्र याआधीच्याही चित्रपटांवर नजर टाकली तर दर वेळी प्रेक्षकांनी कथानक नसलेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचेच दिसते.

मनोजकुमार, ऋषी कपूर, धर्मेद्र, राजेंद्र कुमार, दारासिंग अशी स्टारकास्ट असणारा राज कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. ‘दिदार-ऐ-यार’ चित्रपटात जितेंद्र, रेखा, ऋषी कपूर, रिना रॉय, श्रीराम लागू, निरुपमा रॉय आणि इतरही अनेक कलाकारांचा भरणा असलेल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रझिया सुल्तान’ चित्रपटात हेमामालिनी, धर्मेद्र, परवीन बाबी, प्रदीप कुमार, विजेंद्र घाटगे असे कलाकार होते तरीही हा ही चित्रपट पडला होता. अशीच स्थिती १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बटवारा’ चित्रपटाची झाली होती. या चित्रपटात धर्मेद्र, विनोद खन्ना, अमृता सिंग, डिंपल कपाडिया, अमरिश पुरी, शम्मी कपूर, आशा पारेख, पूनम ढिल्लोन, अमिताभ बच्चन अशी कलाकारांची फौजच होती. तरी हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला. १९७६ या वर्षी पुनर्जन्मावरील कथेवर आधारित ‘मेहबूबा’ चित्रपटातही राजेश खन्ना, हेमामालिनी, प्रेम चोप्रा, असरानी, आशा सचदेव, सुजीत कुमार, मनमोहन कृष्णा असे मोठे कलाकार होते पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.

देशभक्ती किंवा युद्धाशी संबंधित चित्रपटांना प्रेक्षक पसंती देतात. मात्र ‘एलओसी कारगिल’ हा चित्रपट तगडी स्टारकास्ट असूनही अपवाद ठरला. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जे.पी दत्ता दिग्दर्शित ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, अक्षय खन्ना, नागार्जून, राणी मुखर्जी, करिना कूपर, संजय कपूर, सुनील शेट्टी, रविना टंडन, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, महिमा चौधरी, इशा देओल, दिव्या दत्ता इतके सारे कलाकार होते. तरी हा चित्रपट पडलाच.

अशा दणकून आपटलेल्या जुन्या चित्रपटांची यादी सांगायची झाल्यास ‘जबरदस्त’ (१९८५), ‘राजपूत’ (१९८२), ‘कुदरत’ (१९९८), ‘द ग्रेट ग्रॅम्बलर’ (१९७९), ‘शान’ (१९८०) या चित्रपटांची नावं घ्यावी लागतील. त्या काळात गाजलेल्या अभिनेत्यांच्या दुहेरी किंवा तिहेरी भूमिका असणारे मल्टीस्टारर चित्रपटही आपटले होते. यात दिलीपकुमार यांची दुहेरी भूमिका असलेला ‘दास्तान’ (१९७२), तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ (१९७६) यांचा समावेश होतो. अमिताभ बच्चम यांची तिहेरी भूमिका असलेला ‘महान’ (१९८३) आणि दुहेरी भूमिका असलेला ‘पुकार’ (१९८३) हे मल्टीस्टारर चित्रपटही चांगलेच आपटले होते.

१९९० ते २०१५ काळातील अशा मल्टीस्टारर पडलेल्या चित्रपटांची यादी करायची झाल्यास त्यात अंदाज अपना अपना (१९९४), लव्ह के लिये कुछ भी करेगा (२००१), जानी दुष्मन (२००२), बूम (२००३), युवा (२००४), अब तुम्हारे हवाले वतन साथियो (२००४), चॉकलेट (२००५), ओंमकारा (२००६), बाबुल (२००६), डरना जरुरी है (२००६), राम गोपाल वर्मा की आग (२००७),  सलाम-ए-इश्क (२००७), टशन (२००८), युवराज (२००८), मिशन इस्तंबूल (२००८), ब्लू (२००९), तीन पत्ती (२०१०), वन्स अप ऑन अ टाइम इन मुंबई (२०१०), थँक यू (२०११), आरक्षण (२०११), प्लेयर्स (२०१२), किल दील (२०१४), फाइंडिंग फेनी (२०१४), हमशकल्स (२०१४), उंगली (२०१४) यांची नावे घेता येतील.ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि परिक्षक दिलीप ठाकूर या विषयी म्हणाले, याचा दोष तंत्रज्ञानाला आणि चित्रपटाकडे पाहण्याच्या बदललेल्या दृष्टिकोनाला आहे. पूर्वी लोकांना सुपरस्टार्सचं आकर्षण असायचं. दिलीप कुमार, राज कपूर, अमिताभ यांना पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांमध्ये जायचे. आता हे आकर्षण निघून गेलं आहे. आता लोकांना सुपरस्टार्सऐवजी चित्रपटांमध्ये कथानक हवे आहे. कथा चांगली असेल तर चित्रपट चालणार असं सध्याचं गणित झालं आहे. वाईट चित्रपटांसाठी वेळ घालवण्याइतका वेळ आता प्रेक्षकांकडे नाहीये. आज तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे इंटरनेट, सामाजिक माध्यमांमुळे चित्रपटाची जाहिरातबाजी शक्य झाली आहे तसंच चित्रपट चांगला की वाईट हे तो न पाहताच कळू लागले आहे. याचाही फटका चित्रपटांना बसत आहे. युटय़ूब, ट्विटरसारख्या माध्यमातूनही चित्रपटांचे ट्रेलर्स प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतात. आधी तसं नव्हतं. केवळ पोस्टर्सच्या माध्यमातून चित्रपटाची जाहिरात केली जायची त्यामुळे उत्सुकता अधिक असायची. आता एखाद्या कलाकाराला पाहाण्याची तशी उत्सुकता राहिलेली नाही. कलाकाराऐवजी आता प्रेक्षक गोष्टीला प्राधान्य देताना दिसतात, असंही ठाकूर यांनी सांगितले.

एकंदरीतच प्रेक्षकांना आता भरमसाठ कलाकारांऐवजी चांगली कथा असलेले चित्रपट अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. त्यामुळे त्यांनी मल्टीस्टारर चित्रपटांऐवजी कथेवर आधारित आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची कास धरली आहे. निर्मात्यांनीही याची दखल घेतल्यास स्टारकास्टवर खर्च करण्याऐवजी त्यांना कमी बजेटमध्ये दर्जेदार सिनेमांची निर्मिती करता येईल असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.

मराठीतही हाच कल

केवळ मागील तीन वर्षांच्या मराठी चित्रपटांच्या यादीवर नजर टाकली तर पडलेल्या मल्टीस्टारर मराठी चित्रपटांत   शासन (२०१६), बंध नायलॉनचे (२०१६), तिचा उंबरठा (२०१६), वेस म्हणजे वेस (२०१६), दुनिया गेली तेल लावत (२०१६), पिंडदान (२०१६), दमलेल्या बाबाची कहाणी (२०१६), ३५ टक्के काठावर पास  (२०१६), १२३४ (२०१६), यारी दोस्ती (२०१६), कौल मानाचा (२०१६), क्षितिज (२०१६), नागपूर अधिवेशन (२०१६), गाव थोर पुढारी थोर (२०१७), खोपा (२०१७), आयटमगिरी (२०१७), बसस्टॉप (२०१७), माझा एल्गार (२०१७), तू तिथे असावे (२०१८), पाटील (२०१८), माझ्या बायकोचा प्रियकर (२०१८), सॉरी (२०१८) यांचा समावेश करावा लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood hindi movies

ताज्या बातम्या