‘सोशल मीडिया ट्रोलिंग’ हा विषय आता अनेकांच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. दररोज एखाद्या ट्विटमुळे किंवा पोस्टमुळे नेटकरी काही सेलिब्रिटींवर निशाणा साधतात. बऱ्याचदा नेटकऱ्यांकडून होणारे हे ट्रोलिंग विनाकारण करण्यात येते. मात्र, काहीवेळा सेलिब्रिटींकडून अनावधनाने होणाऱ्या चुका ट्रोलर्ससाठी आयती संधी ठरते. अशा या सोशल मीडिया ट्रोलिंगच्या कचाट्यात सध्या ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर सापडले आहेत. ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी यांच्या निधनानंतर जावेद अख्तर यांनी ट्विट केले होते. मात्र, यावेळी झालेला टायपो एरर त्यांना चांगलाच महागात पडला.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि ठुमरी सम्राज्ञी गिरीजादेवी यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानंतर अनेकांनीच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जावेद अख्तरही गिरीजा देवी यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. पण, ट्विट करताना आलेला टायपो एरर त्यांच्याही नजरेतून सुटला आणि सोशल मीडियावर त्यांची ही चूक काहीजणांच्या लक्षात आली. गिरिजा देवी यांच्या जाण्याने कलाविश्वात एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली आहे, असे ट्विट त्यांनी केले. ‘गिरिजा देवी वॉज नॉट ओन्ली अ ग्रेट क्लासिकल सिनर बट अ नॅशनल ट्रेझर’, अशी ओळ त्यांनी ट्विट केली. इथे ‘सिनर’ या शब्दाऐवजी त्यांना ‘सिंगर’ हा शब्द वापरायचा होता. पण, ‘सिनर’ असा शब्द तिथे टाईप झाला. ही बाब जावेद अख्तर यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षमा मागत पुन्हा एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी शब्द टाईप करताना झालेल्या त्या चुकीबद्दल सर्वांची माफी मागितली. पण, त्यांच्या या माफी मागण्याचा नेटकऱ्यांवर फारसा परिणाम झाला नाही.

‘सिनर’ या शब्दाचा अर्थ पापी असा होत असल्यामुळे अख्तर यांच्या त्या ट्विटचा अर्थच पूर्णपणे बदलला होता. त्यामुळे ट्विटर युजर्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.. आपल्यावर होत असलेल्या या टीका पाहून शेवटी अख्तर यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र, तोपर्यंत या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.