बॉलिवूडमध्ये २०१७ च्या अगदी सुरुवातीपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकले नाहीये. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जब हॅरी मेट सेजल’चाही या यादीत समावेश झाला आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचं एकंदर चित्रीकरण आणि स्टारकास्ट पाहता त्याच्या निर्मिती खर्चाचा अंदाज लावता येतो. अनेकांनाच या चित्रपटाच्या चांगल्या कमाईची अपेक्षा होती. पण, शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. शाहरुख- अनुष्काची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा गल्ला रिकामाच राहिला. त्यामुळे आता झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी चित्रपट वितरकांनी थेट शाहरुख खानकडे धाव घेतली आहे.

‘जब हॅरी…’ला मिळालेल्या अपयशामुळे किंग खानच्या अडचणी आणखीनच वाढल्याचं म्हटलं जात आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘एनएच स्टुडिओज’ला या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशाचा सर्वाधित फटका बसल्याचं म्हटलं जात आहे. या कंपनीने शाहरुखला एक मेसेज केला असून शाहरुखनेही सलमानच्याच कृतीचं अनुकरण करावे अशी मागणी केली आहे. या चित्रपटाचे सॅटेलाइट आणि संगीत- डिजिटल हक्क विकून शाहरुखला नफा झाला आहे त्यातूनच त्याने वितरकांनी नुकसान भरपाईची रक्कम देऊ करावी असा तगादा त्याच्यामागे लावण्यात येतोय.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

एखादा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर वितरकांचा असा तगादा लागणं शाहरुखसाठी काही नवीन नाही. याआधीही ‘दिलवाले’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. त्यावेळी त्याने वितरकांना जवळपास २५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली होती. त्याशिवाय ‘अशोका’ आणि ‘पहेली’ या चित्रपटांच्या वेळीसुद्धा किंग खानसमोर अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हाही त्याने वितरकांना काही रक्कम दिली होती. त्यामुळे आता किंग खान वितरकांची मदत करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.