गेल्या काही वर्षांत सातत्याने नवनवीन तरुण कलाकारांची फळी बॉलीवूडमध्ये आपला जम बसवू पाहते आहे. मात्र, या नव्या कलाकारांना एकतर तुलनेने व्यावसायिक मोठे चित्रपट मिळत नाहीत किंवा कुठल्या तरी आघाडीच्या कलाकाराबरोबर जोडी जमवत ते प्रेक्षकांसमोर येतात. हिंदी चित्रपटसृष्टीतला नायक-नायिकांचा ठरावीक साचा तोडण्याचा प्रयत्न काही निर्माते – दिग्दर्शक अधूनमधून करत असतात आणि ती समीकरणे यशस्वी ठरली नाही तर गाडी मूळ पदावर येते. मात्र, या वर्षाची सुरुवातच नायक-नायिकांच्या काही नव्या जोड्या आणि नवी समीकरणं जुळवणाऱ्या चित्रपटांनी झाली आहे.

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ हा चित्रपट फेब्रुवारीत व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही वेगळी जोडी पडद्यावर एकत्र आली होती. त्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर अशी हटके जोडी होती. त्याशिवाय, अगदी पूर्णपणे नवीन कलाकारांना एकत्र आणण्याचा प्रयोगही करून पाहिला जातो आहे. अभिनेता आदर्श गौरव आणि अभिनेत्री शनाया कपूर यांचा ‘तू या मैं’ हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘एक दिन’ या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांची जोडी पाहायला मिळाली. आता मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि ‘किल’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता लक्ष्य लालवानी यांचा ‘चांद मेरा दिल’ हा चित्रपटही लक्ष वेधून घेतो आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि हिंंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते हेही समीकरण गेल्या दोन-तीन वर्षांत चांगलंच रुळलं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानापाठोपाठ आता साई पल्लवी हेही नाव हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चेत आहे. तिची भूमिका असलेला एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातही ती अभिनेता रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतून पदार्पण करणारी अभिनेत्री श्रीलीला आणि अभिनेता कार्तिक आर्यन ही आणखी एक वेगळी जोडी अनुराग बासू दिग्दर्शित ‘तू मेरी जिंदगी है’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर दक्षिणेतून येऊन बॉलीवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया आगामी ‘शांताराम’ या प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘वन – द फोर्स ऑफ फॉरेस्ट’ नामक एका चित्रपटातही तमन्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर एकत्र काम करते आहे.

अगदी नव्याकोऱ्या जोड्या…

‘मुंज्या’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अभय वर्माचे दोन आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहेत. ११ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘लाईका लाईका’ या सौरभ गुप्ता दिग्दर्शित चित्रपटात अभय वर्मा आणि अभिनेत्री रवीना टंडन हिची कन्या राशा थडानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित ‘किंग’ या चित्रपटात अभय वर्मा आणि शाहरुखची कन्या सुहाना खान ही जोडी एकत्र दिसणार असल्याचे सांगितले जाते. जूनमध्ये प्रदर्शित होणारा आणखी एक चित्रपट त्याच्या दिग्दर्शकामुळे आणि नायक-नायिकेच्या जोडीमुळे चर्चेत आहे. प्रेमपटांचा बादशाह असलेल्या इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या आगामी चित्रपटात ‘द आर्चीज’मुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता वेदांग रैना आणि अभिनेत्री शर्वरी वाघ ही जोडी एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ हासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय, तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रोहित सराफ त्याच्या आगामी चित्रपटात ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेबमालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सहर बांबा हिच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता इम्रान खानचे पुनरागमन…

अगदी अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी पटेल खतरनाक जासूस’ या आमिर खान प्रॉडक्शनच्या चित्रपटातून छोटेखानी भूमिका करत अभिनेता इम्रान खानने आपण पुनरागमन करत असल्याची वार्ता दिली होती. आता लवकरच तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘अधुरे हम अधुरे तुम’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरबरोबर दिसणार आहे.

अक्षय कुमार, वरुण धवन आणि सलमान खानही रांगेत…

अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूत बंगला’ या चित्रपटात अभिनेत्री वामिका गाबी हिच्याबरोबर काम केले होते. आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात अभिनेता वरुण धवन पहिल्यांदाच अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरबरोबर दिसणार आहे. तर अभिनेता आयुषमान खुराणा हासुद्धा आगामी ‘पती पत्नी और वोह दो’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान, वामिका गाबी आणि रकुल प्रीत सिंग यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. एप्रिल संपता संपता आणखी एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे ‘जवान’ चित्रपटात अभिनेता शाहरुख खानबरोबर झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता सलमान खान ही जोडी निर्माते दिल राजू यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.