किशोर अर्जुन
इतिहासाच्या पुस्तकात, संसदेत, निवडणुकीच्या प्रचारात, लाल किल्ल्यावर, सीमेवर आणि सिनेमाच्या पडद्याआधी वाजणार्‍या राष्ट्रगीतामध्ये, आपल्याला ‘देश’ अनेक रूपांत भेटत असतो. पण गेल्या आठ दशकांत ‘देश’ ही संकल्पना भारतीयांनी सर्वाधिक भावनिक पातळीवर कुठे अनुभवली असेल, तर ती कदाचित सिनेमाच्या पडद्यावर. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात विविधतेने भरलेल्या समाजाला ‘राष्ट्र’ या सामूहिक कल्पनेशी जोडण्याचे काम लोकप्रिय सिनेमानेही केले. तिरंगा, राष्ट्रगीत, सैनिक, शेतकरी, स्वातंत्र्यसैनिक, सीमेवरचे युद्ध, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभा राहिलेला तरुण, या सगळ्या प्रतिमांनी भारतीयांच्या मनात ‘देशभक्ती’ची एक दृश्य आणि भावनिक भाषा सातत्याने तयार केली. म्हणजेच सिनेमाने केवळ देशभक्तीपर सिनेमेच तयार केले नाहीत तर, देशभक्ती म्हणजे काय, याची भारतीयांची कल्पनाही घडवली, असे म्हणता येऊ शकते.

मात्र गेल्या ८० वर्षांत भारतीयांच्या देशभक्तीची कल्पना कशी बदलत गेली, हे हिंदी सिनेमाच्या प्रवासातून पाहिले तर नेमके काय दिसते? स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांत राष्ट्राची कल्पना मुख्यत: त्याग, एकात्मता आणि पुनर्निर्माणाभोवती होती. शहीद (१९६५), उपकार (१९६७) आणि पूरब और पश्चिम (१९७०) यांसारख्या चित्रपटांत भारत म्हणजे मातृभूमी, शेतकरी, सैनिक आणि स्वातंत्र्यलढ्याची आठवण होती. उपकारमधील ‘जय जवान, जय किसान’ या गाण्याने केवळ लोकप्रियताच मिळवली नाही तर, नव्याने उभारत असलेल्या देशाला दोन चिरंतन आधारस्तंभांची भावनिक प्रतिमा देखील मिळवून दिली. त्या काळातील देशभक्तीची भाषा तुलनेने खूपच स्पष्ट होती, देश तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्यासाठी त्याग करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे.

दरम्यान, या काळातील युद्धांनी ‘देशासाठी त्याग’ ही प्रतिमा हिंदी सिनेमात आणखी दृढ केली. हकीकत (१९६४)पासून बॉर्डर (१९९७)पर्यंत सैनिक हा हिंदी सिनेमातील देशभक्तीचा सर्वाधिक प्रभावी नायक बनला. सीमेवर उभा असलेला सैनिक म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या सुरक्षेचे मानवी रूप झाले. बॉर्डरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे दाखवून देणारा होता की हिन्दी प्रेक्षकाला युद्धाच्या कथा फक्त पुस्तकात वाचायच्या नसून मोठ्या पडद्यावर भावनिकदृष्ट्या अनुभवायच्या आहेत.

देशभक्तीची पडद्यावरची कथा इथेच थांबली नाही. युद्धभूमीवरून बाहेर आली. लगान (२००१)मध्ये बंदुका नाहीत; क्रिकेट आहे. आधुनिक अर्थाने सैनिकही नाही आणि युद्धभूमीही नाही. तरी एका वसाहतवादी सत्तेविरुद्धचा क्रिकेट सामना सामूहिक प्रतिकाराचे रूपक बनतो. जात, वर्ग आणि सामाजिक भेदांनी विभागलेले गावकरी एका संघात येतात. राष्ट्र म्हणजे सारखे दिसणारे किंवा सारखी भाषा बोलणारे लोक नव्हेत; भिन्नतेतून सामूहिक ध्येय निर्माण करणारे लोक म्हणजे राष्ट्र, अशी कल्पना इथे पुढे येते. तर स्वदेस (२००४)ने देशभक्तीचा प्रश्न आणखी सखोल नेला. परदेशातून परतलेला नायक सीमारेषेवर शत्रूशी लढत नाही. तो एका गावात वीज पोहोचवण्यासाठी सगळे प्रयत्न करतो. जातीय विषमता, गरिबी, प्रशासनाची उदासीनता आणि विकासाचा अभाव या सगळ्यांबरोबर त्याचा संघर्ष आपल्याला दिसतो. आणि या टप्प्यावर देशभक्तीची भाषा बदलताना आपल्याला दिसू लागली. देशासाठी मरण्यापेक्षा देशाला जगण्यासाठी अधिक चांगले बनवणे महत्त्वाचे ठरते.

आणि मग रंग दे बसंती (२००६) आला. या सिनेमातील तरुण सुरुवातीला राजकारणापासून दूर आहेत. इतिहास त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तकातील विषय आहे. पण जेव्हा इतिहास वर्तमानाशी जोडला जातो, तेव्हा ते प्रश्न विचारू लागतात. इथे देशभक्ती म्हणजे सत्तेचे समर्थन नव्हे; सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस आहे, हा विचार या सिनेमाने अधोरेखित केला. लोकशाहीत देशभक्तीची खरी परीक्षा सहमतीत नाही; तर असहमतीलाही देशप्रेमाच्या चौकटीत स्थान देण्यात आहे. चक दे! इंडिया (२००७)ने याच प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने हात घातला. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या मुली एकसंघ होऊन खेळायला शिकतात. ‘टीम इंडिया’ तयार होण्यापूर्वी त्यांना आपसांतील पूर्वग्रह मोडावे लागतात. म्हणजेच राष्ट्राची एकता ही आपोआप मिळालेली गोष्ट नाही. ती सतत निर्माण करावी लागते, हेदेखील आपल्याला सिनेमाच्या माध्यमातूनच रुजवावे लागले आहे.

या संदर्भात गर्म हवा (१९७३)सारखा सिनेमाही महत्त्वाचा ठरतो. फाळणीनंतर भारतात राहिलेल्या एका मुस्लिम कुटुंबाची कथा सांगताना चित्रपटाला तिरंगा, राष्ट्रगीत किंवा युद्धाची गरज पडत नाही. ‘या देशात माझे स्थान कुठे आहे?’ हा प्रश्नच त्याचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्राशी असलेले नाते कधी कधी अशा असुरक्षिततेतूनसुद्धा समोर येते. देश म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नाही; तर तो सर्वसामान्य माणसाला ‘आपलेपणा’ देणारी राजकीय आणि सामाजिक सुरक्षित जागाही आहे, हा देशभक्तीचा एक नवा अर्थ ‘गर्म हवा’ आपल्याला सांगतो.

गेल्या दशकभरात हिंदी पडद्यावरची देशभक्तीची भाषा पुन्हा बदललेली दिसते. बेबी, एअरलिफ्ट, राझी, उरी : द सर्जिकल स्ट्राइक, शेरशाह आणि सॅम बहादूर यांसारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा, सैनिकाचे शौर्य आणि सीमापार संघर्ष पुन्हा केंद्रस्थानी आणले. उरीमधील ‘‘हाऊ’ज द जोश?’’ हा संवाद सिनेमाच्या पडद्याबाहेर जाऊन सार्वजनिक संभाषणाचाही भाग बनला. देशभक्तीच्या सिनेमाने निर्माण केलेली भाषा लोकप्रिय संस्कृतीत किती वेगाने रुजू शकते, याचे हे उदाहरण ठरले. आणि देशभक्ती केवळ त्यागाची भावना नाही; ती आत्मविश्वासपूर्ण, अधिक आक्रमक आणि प्रत्युत्तर देणारी राष्ट्रीय जाणीव असल्याचे या काळातील सिनेमांनी अधोरेखित केले. म्हणजेच देश म्हणजे काय हे सांगता सांगता ‘देशासाठी मरा’ इथून सुरू झालेला प्रवास ‘देशाला चांगले करण्यासाठी झटा’असे सांगत ‘देशाचे रक्षण करा, कारण त्याला धोका आहे ’थपर्यंत येऊन पोहोचला. आणि हा बदल केवळ सिनेमातील नाही. तर तो भारतीय समाजातील राष्ट्रवादाच्या बदलत्या मानसिकतेशी जोडलेला दिसतो.

देशभक्ती आता सिनेमाच्या आशयापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने सिनेमांच्या घोषणेत, समाजमाध्यमांवर हॅशटॅगमध्ये, बॉक्स ऑफिसच्या आकड्यांत आणि प्रेक्षकांच्या स्वत:च्या राजकीय ओळखीतही प्रवेश केलेला दिसतो. त्यामुळे देशभक्तीचा सिनेमा ही केवळ कलाकृती राहिलेली नाही; तो एका मोठ्या सांस्कृतिक बाजारपेठेचा भागही बनला आहे. त्यामुळे देशभक्ती पडद्यावर अनुभवली जाण्यासोबत आता विकलीही जाते, समाजमाध्यमांवर शेअरही केली जाते आणि राजकीय अर्थाने वापरलीही जाते. द काश्मीर फाइल्स, गदर २ किंवा आर्टिकल ३७० यांसारख्या सिनेमांना मिळालेल्या प्रतिसादात इतिहास, अस्मिता, राजकारण आणि बदलत्या सामूहिक भावनांचा मोठा भाग असल्याचे दिसते.

असे असले तरी भारतीय देशभक्ती ही एकरेषीय नाही, हेच आपल्याला आजवरच्या विविध सिनेउदाहरणातून दिसले आहे. तिच्यात अभिमान आहे, पण अस्वस्थताही आहे. त्याग आहे, पण प्रश्नही आहेत. राष्ट्राची महती आहे, पण राष्ट्राच्या अपयशाची जाणीवही आहे. १२वी फेलसारखा सिनेमाही राष्ट्रनिर्मितीची कथा सांगू शकतो, एका सामान्य तरुणाची, जो अपयश, गरिबी आणि व्यवस्थेच्या अडचणींवर मात करून प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करतो. आर्टिकल १५ जातीय अन्यायाला प्रश्न विचारतो. अशा सिनेमांत देशभक्तीचा थेट उल्लेख कदाचित केंद्रस्थानी नसेल; पण देशासाठी लढणे आणि देशाला अधिक चांगले बनवणे या दोन्ही गोष्टी राष्ट्रनिर्मितीचीच वेगवेगळी रूपे आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे.

उरी पाहून उत्साहाने टाळ्या वाजवणारा प्रेक्षक स्वदेसने अंतर्मुख होऊ शकतो. गदर २च्या राष्ट्रवादी भावनेशी जोडला जाणारा तोच प्रेक्षक रंग दे बसंतीमधील व्यवस्थेविरोधी प्रश्नांशीही स्वत:ला जोडू शकतो. चक दे! इंडियामधील विविधतेतील एकता त्याला भावू शकते आणि त्याच वेळी युद्धपटातील सैनिकाचे बलिदानही त्याला हेलावून टाकू शकते. म्हणून देशभक्तीच्या सिनेमाची खरी कसोटी इथेच आहे, तो आपल्याला कोणता भारत दाखवतो, त्या भारतात कोणाला स्थान देतो आणि भविष्यातील कोणता भारत आपल्या कल्पनेसमोर उभा करतो.
(लेखक पटकथा लेखक – दिग्दर्शक आहे.)