सध्याच्या घडीला संपूर्ण कलाविश्वात एकाच गोष्टीच्या चर्चा सुरु आहेत. त्या चर्चा म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाच्या. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी श्रीदेवी यांचं निधन झालं. कोणतीही कल्पना नसताना अनपेक्षितपणे झालेला हा आघात सर्वांनाच शोकसागरात लोटून गेला. ‘चांदनी’, ‘मिस हवाहवाई’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कलाकार मंडळींनी कपूर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी धाव घेतली. या साऱ्यामध्ये श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिच्यावर मोठा आघात झाला. ‘धडक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे जान्हवी दुबईमध्ये कौटुंबिक समारंभाला जाऊ शकली नव्हती. त्यामुळे श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी तिच्यापर्यंत काही वेळाने पोहोचली. त्यांच्या निधनाची बातमी तिला कोणी दिली, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता.

वाचा : BLOG : या अभिनेत्रींचं धक्कादायक जाणे…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने जान्हवीला सर्वप्रथम श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल सांगितलं. त्यानंतर तिला सावरणं कठीण झालं असल्याचंही पाहायला मिळालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत करणने जान्हवीला लगेचच अनिल कपूर यांच्या जुहू येथील घरी नेलं. त्यावेळी तिची मॅनेजर, मैत्रीण रेश्मा शेट्टीसुद्धा हजर होती.

वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा…

श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त कलाविश्वात जसजसे पसरत गेले, तसतशी कलाकारांची पावलं कपूर यांच्या घराकडे वळली. श्रीदेवी यांच्या मृत्युची बातमी कळताच अभिनेता अर्जुन कपूर यानेही चित्रीकरण अर्ध्यावर सोडून या दु:खद प्रसंगाच्या वेळी खुशी आणि जान्हवी कपूर यांना आधार देण्यासाठी धाव घेतली. जान्हवी सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणावर जास्त लक्ष देत असून खुद्द श्रीदेवीसुद्धा तिच्या करिअरच्या दृष्टीने फारच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत होतं. आपल्या दोन्ही मुलींच्या करिअरमध्ये त्या जातीने लक्ष घालत होत्या. त्यांच्या अकस्मात निधनामुळे आता जान्हवी आणि खुशी या दोघींच्याही आयुष्यात एक पोकळीच निर्माण झाली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.