अभिनेत्री झरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. झरीन मागील अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. झरीन ‘हेट स्टोरी 3’ मध्ये झळकली होती. यातील तिच्या बोल्ड दृश्यांनी लक्ष वेधून घेतले होते. यानंतर तिने ‘अक्सर 2’ मध्ये काम केलं. या चित्रपटातही तिचे खूप बोल्ड सीन होता. पण या बोल्ड सीनबद्दल दिग्दर्शकाने फसवणूक केली होती असा खुलासा झरीनने केला आहे.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत झरीन खानने सांगितलं की ‘हेट स्टोरी ३’ नंतर तिला अशाच प्रकारच्या भूमिका मिळत होत्या. पण तिला एकाच पद्धतीच्या भूमिकेत टाइपकास्ट व्हायचं नव्हतं; त्यामुळे ‘अक्सर २’ साठी होकार देण्यापूर्वी तिने दिग्दर्शक अनंत महादेवन यांना चित्रपटातील तिची भूमिका इंटिमेट असणार नाही याबाबत खात्री करून घेतली होती. पण नंतर मात्र तिला प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये किस करायला सांगण्यात आलं होतं.
‘अक्सर २’ चे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी फसवणूक केल्याचा आरोप झरीनने केला. “जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट करता, तेव्हा तुम्हाला तशाच प्रकारच्या भूमिका ऑफर होतात. मला टाइपकास्ट व्हायचं नव्हतं. मी खूप धाडस करून हेट स्टोरी सिनेमा केला होता. नंतर मला दिग्दर्शकाने ‘अक्सर २’ ची कथा ऐकवली. पहिल्या ‘अक्सर’मध्ये इमरान हाश्मी होता. तो सिनेमा खूपच चांगला होता. त्यामुळे मी या हिट फ्रेंचायजीचा भाग होण्यास उत्सुक होते. दिग्दर्शकाने माझ्याशी बोलून मला सगळं समजावून सांगितलं. मी त्यांना विचारलं की यात बोल्ड सीन्स नसतील ना? त्यावर ते म्हणाले, ‘नाही. आपण हेट स्टोरी बनवत नाहीयोत.’ मी म्हणाले. ठीक आहे,” असं झरीनने नमूद केलं.
‘शूटिंग सुरू झाल्यावर प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये किस करायला सांगितलं’
झरीन खान पुढे म्हणाली, “शूटिंग सुरू झाल्यावर प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये मला किस करायला सांगितलं जात होतं. मला हे सगळं खूप विचित्र वाटलं. मी असं म्हणणार नाही की मी सती सावित्री आहे किंवा पाकिझा आहे, त्यामुळे मी हे करणार नाही. पण मी आधीच असा एक चित्रपट केला होता, त्यांनी मला चित्रपटात असे सीन असतील याची कल्पना दिली होती. मात्र इथे उलटंच घडलं. चित्रपटात बोल्ड सीन्स नसतील असं सांगून मी सेटवर गेल्यावर असेच सीन असायचे. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं स्वाभाविक होतं, आणि मी तेच केलं.”
‘मला माझ्याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये बोलावलं नाही’
झरीन खान पुढे म्हणाली, “ते प्रॉडक्शन हाउस मोठं होतं आणि मी दिग्दर्शकाला जाब विचारला होता. कारण आम्ही हेट स्टोरी बनवत नाहीयोत असं तो मला म्हणाला होता. मात्र तो निर्मात्यांसमोर हे कबूल करू शकत नव्हता, त्यामुळे तो त्यांना माझ्याबद्दल काहीही सांगायचा. मग मला म्हणायचा की निर्माते त्याच्यावर दबाव टाकत आहेत. यामुळे माझ्यात व निर्मात्यांमध्ये मतभेद झाले आणि सगळ्यात मला वाईट ठरवण्यात आलं. वाद इतका वाढला की मला माझ्याच चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये बोलावलं नाही.”