3 Idiots Sequel Update Rajkumar Hirani: कॉलेजमधील धमाल, मैत्री आणि शिक्षणव्यवस्था यांवर आधारित ‘३ इडियट्स’ सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रँचो, राजू व फरहान यांची गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटली होती. आता सिनेमाच्या सीक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘३ इडियट्स’च्या सीक्वेलबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी वक्तव्य केले आहे.

एका ऑनलाइन मुलाखतीमध्ये राजकुमार हिरानी यांनी ‘३ इडियट्स’च्या पुढच्या भागाबद्दल सांगितले आहे. लवकरच ‘३ इडियट्स’चा सीक्वेल येणार असून, त्यावर सध्या काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अजून हा सिनेमा कागदावरच असून, त्याच्या पटकथेवर काम सुरू आहे. राजकुमार हिरानी म्हणाले, “अजून चित्रपटाची गोष्ट लिहिली जात आहे. अजून आम्ही गोष्टीवरच काम करीत आहोत. जेव्हा पूर्ण लिहून होईल तेव्हा याबाबत घोषणा केली जाईल.”

सिनेमाचे कास्टिंग हे तेच राहणार – राजकुमार हिरानी

‘३ इडियट्स’मध्ये आमिर खान, आर. माधवन व शर्मन जोशी यांनी प्रभावीपणे भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर करीना कपूर, बोमन इराणी व ओमी वैद्य यांच्या भूमिकांनी लक्ष वेधले होते. आता सिनेमाच्या सीक्वेलमध्येही हेच कलाकार झळकणार का याबाबत, हिरानींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “सिनेमाचे कास्टिंग हे तेच कायम राहणार आहे. सर्व कलाकारही त्याच भूमिकेमध्ये राहणार आहेत.”

पुढे ते म्हणाले, “मी आधी मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाचा लगे रहो मुन्नाभाई म्हणून सीक्वेल बनवला होता. त्यावेळीसुद्धा दुसरा भाग बनवावाच, असा माझा कोणताही हेतू नव्हता. तो काळसुद्धा असा होता की, तेव्हा सिनेमाचा सीक्वेल बनवला, तर तो चालत नाही, असाच समज त्यावेळी होता. त्यामुळे लोकांनीसुद्धा म्हटले होते की, कशाला दुसरा भाग बनवताय, तेव्हा मी हेच म्हणालेलो की, लोकांनी सिनेमा बघायला जावे म्हणून मी दुसरा सिनेमा बनवत नाही. पण मी जी गोष्ट लिहीत होतो, ती मुन्नाभाई एमबीबीएसमधील भूमिकांना योग्य वाटली, म्हणून मी सीक्वेल बनवला होता.”

२० वर्षे पुढची गोष्ट असणार – राजकुमार हिरानी

पुढे राजकुमार हिरानी म्हणाले, “यावेळीसुद्धा एक गोष्ट लिहीत होतो; पण ती गोष्टही आपल्या ‘३ इडियट्समधील भूमिकांसाठी योग्य वाटली. पण आता पुढची गोष्ट ही तीन कॉलेज विद्यार्थ्यांची नसेल, तर २० वर्षे पुढची असणार आहे. पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये काय झाले, याबद्दल दुसऱ्या सिनेमामध्ये सांगितले जाईल. पण, अजून गोष्ट लिहिण्याचे काम सुरू आहे आणि त्यामुळे पुढेच काही सांगू शकत नाही.”

दरम्यान, २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘3 इडियट्स’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. सिनेमाची गोष्ट, शिक्षणव्यवस्थेची व्यथा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरवरील दबाव याचे चित्रण सिनेमात मांडण्यात आले होते. त्यातील आमिर खानचे रणछोडदास शामलदास चांचड (‘रँचो’) हे पात्र लेहमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचा दावा केला जातो.