Mouni Roy play Varun Dhawan mother role : दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘हे जवानी तो इश्क होना है’ चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून, त्यामध्ये वरुण धवनसह मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटातील ‘चुनरी चुनरी’ गाण्याच्या रिमेकवरून आधीच वाद सुरू असताना आता आणखी एका गोष्टीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

४० वर्षीय अभिनेत्री मौनी रॉयने ३९ वर्षीय वरुण धवनच्या आईची भूमिका साकारल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयला आईच्या भूमिकेमध्ये घेतल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

मौनी रॉयने साकारली आईची भूमिका

‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांना चित्रपटाची स्टोरी आवडली असून, त्यांनी कलाकारांचे कौतुक केले आहे. मात्र, काही जणांनी वरुण धवन सातत्याने दोन अभिनेत्रींसह स्क्रीन शेअर करीत असल्याने त्याला ट्रोल केले आहे. वरुण धवन त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये दोन अभिनेत्रींसह झळकतो. ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटामध्येदेखील तो पूजा हेगडे व मृणाल ठाकूर या दोन अभिनेत्रींसह दिसून येणार आहे. त्याचबरोबर आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री वरुण धवनच्या चित्रपटामध्ये आहे आणि ती म्हणजे मौनी रॉय. पण, ती वरुण धवनची प्रेयसी म्हणून नाही, तर त्याची आई म्हणून भूमिका साकारणार आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केले आश्चर्य

मालिका आणि चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवलेली मौनी रॉय ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिचा मोठा चाहतावर्ग असून, मौनी फॅशन आणि मॉडेल म्हणून तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. ४० वर्षीय असलेल्या मौनीने ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटामध्ये ३९ वर्षीय वरुण धवनच्या आईची भूमिका साकारली आहे. केवळ एक वर्षाने मोठी असलेल्या मौनीने वरुणच्या आईचे पात्र साकारल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे; तर काही नेटकऱ्यांनी ट्रोलदेखील केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, यामध्ये काहीही कॉमेडी वाटत नाही. सतत तोचतोपणा पाहायला मिळतो आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, हे कसे शक्य आहे की, एकाच वयाचे कलाकार आई आणि मुलाची भूमिका साकारत आहेत.

मौनीची एन्ट्री ठरतीये लक्षवेधी

‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वरुण धवन त्याला खोटी आई पाहिजे असल्याचे सांगत असतो. निरुपमा रॉय यांच्यासारखी दिसणारी आई पाहिजे, असे म्हणताच मौनी रॉयची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. स्टायलिश साडीमध्ये मौनीची एन्ट्री लक्षवेधी ठरत आहे. तिचा लूक आणि स्टाईलचे नेटकरी कौतुक करीत असले तरी ती वरुणच्या आईची भूमिका साकारत असल्यामुळे तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.