Vivek Agnihotri reaction on Mamata Banerjee defeat : विवेक अग्नीहोत्री बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द बंगाल फाइल्स यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. विवेक अग्नीहोत्री अनेकदा त्यांच्या  स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत असतात. ते अनेकदा त्याची मतं, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतात. अशातच आता त्यांनी ४ मे रोजी पार पडलेल्या बंगला येथील निवडणुकीच्या निकालाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत ममता बॅनर्जी यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी बंगालमधील जनतेचे अभिनंदन करत म्हटलं की, आता लोक राज्यात भीती न बाळगता ताट मानेने जगू शकतील. या वेळी त्यांनी त्यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाच्या वाटेत ममता बॅनर्जी यांनी आडकाठी आणल्याची आठवण करून नाराजी व्यक्त केली.

विवेक अग्नीहोत्री नेमकं काय म्हणाले?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी “नेव्हर अगेन…” असं लिहिलं. तसंच त्यांनी सांगितलं की, ‘द कश्मीर फाइल्स’ प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटावर बंगालमध्ये बंदी आणण्यात आलेली आणि चित्रपट थिएटरमधून काढण्यात आला आणि त्यांना बंगालमध्ये येण्यासही परवानगी देण्यात आली नव्हती. असंच काहीसं ‘द बंगाल फाइल्स’बरोबरही घडलं. या चित्रपटावरही पूर्ण बंदी घालण्यात आली. ट्रेलर लाँच थांबवण्यात आला, त्यांच्यावर हल्ला झाला, मारहाण झाली आणि त्यांच्याविरोधात अनेक एफआयआर नोंदवण्यात आल्या.

ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर विवेक अग्नीहोत्री यांनी व्यक्त केला आनंद

विवेक यांनी सांगितलं की, ते राज्यपालांकडून आपला पुरस्कार घेण्यासाठीही जाऊ शकले नाहीत. तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. निवडणुकीदरम्यान त्यांनी शांतपणे संपूर्ण बंगालमध्ये ‘द बंगाल फाइल्स’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. विवेक यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “मला आनंद आहे की आम्ही हार मानली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने लढलो आणि शेवटी हा मोठा विजय मिळाला. बंगालच्या महान जनतेचे अभिनंदन. आता तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय ताट मानेने चालू शकता.”

दरम्यान, विवेक अग्नीहोत्री त्यांच्या या चित्रपटांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. काहींनी त्यांना यासाठी पाठिंबा दिला तर काहींनी टीका केली. अशातच आता ही पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या चित्रपटाला मॅमता बॅनर्जी यांनी विरोध केल्यामुळे त्यांना निवडणुकीत मिळालेल्या पराभवावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.