Madhuri Dixit Reel Video : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या दिलखेचक अदांनी कायमच चाहत्यांना भुरळ घालते. माधुरीच्या नृत्यशैलीचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. ‘धकधक गर्ल’ सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यांवर किंवा तिच्या जुन्या सदाबहार गाण्यांवर Reel व्हिडीओ बनवत असते. तिने शेअर केलेल्या अशाच एका खास व्हिडीओने सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘मैं वापस आऊंगा’ हा इम्तियाज अलीचा सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामधील ‘मस्कारा’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. ‘किस मिस यारा लाए मस्कारा…’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं असून, मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ या गाण्यात झळकली आहे. ‘मस्कारा’ गाण्यावर नेटकऱ्यांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्ध खास व्हिडीओ बनवले आहेत. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर जवळपास २ महिन्यांनंतर माधुरी दीक्षितने ‘मस्कारा’ गाण्यावर खास सादरीकरण केलं आहे.

‘धकधक गर्ल’ने इतरांच्या तुलनेत ‘मस्कारा’ ट्रेंड उशीरा फॉलो केला असला, तरीही तिच्या दिलखेचक अदा, क्युट एक्स्प्रेशन्सनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातलीये. माधुरीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

माधुरी गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस, कपाळावर मॅचिंग टिकली, हातात हिऱ्याची सिंपल अंगठी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या रील व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकर, मनीष पॉल यांनी खास कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. याशिवाय अन्य नेटकरी म्हणतात, “आजही माधुरी मॅमचे एक्स्प्रेशन्स जसेच्या तसे आहेत…त्यांना तोडच नाही”, “ब्युटी क्वीन माधुरी दीक्षित”, “एक्स्प्रेशन्स Queen”, “याला म्हणतात परफॉर्मन्स बेस्ट बेस्ट बेस्ट”, “आम्ही किती दिवस या व्हिडीओची वाट पाहतोय”, “फायनली माधुरी मॅम The OG यांनी हा ट्रेंड फॉलो केलाय”, “लव्ह माधुरी मॅम”, “ओह हो…कमाल डान्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री पहिल्यांदाच ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचा मराठी सीझन होस्ट करणार आहे. काही दिवसांपूर्वीच याची घोषणा करण्यात आली. माधुरी होस्ट असल्याने प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आजपासून सहभाग घेण्यास उत्सुक असलेले प्रेक्षक रजिस्ट्रेशन करू शकतात. लवकरच या कार्यक्रमाची लॉन्च डेट जाहीर केली जाईल.