Tragic life story of Bollywood actress : आपण अनेकदा बॉलीवूड कलाकारांच्या आलिशान आणि झगमगत्या जीवनशैलीबद्दल ऐकतो. मात्र या चमकदार दुनियेच्या मागे अनेकदा संघर्ष, अडचणी आणि वेदनादायक वास्तवही दडलेलं असतं. काही कलाकारांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक अडचणी आणि एकटेपणाचा सामना केला.
आज आपण अशाच बॉलीवूडमधील अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना आयुष्यात यश तर मिळालं पण, त्यांना अनेक कठीण आव्हानांना सामोरं जावं लागलं. या अभिनेत्रीचं नाव आहे विमी. विमी यांचा जन्म १९४३ साली जालंधरमध्ये पंजाबी सीख कुटुंबात विमलेश कौर वाधवान या नावाने झाला. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच त्यांचं लग्न उद्योगपतींचा मुलगा शिव अग्रवाल याच्याशी झालं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती.
एका पर्टीने बदललं आयुष्य
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार विमी यांचा शोध एका पार्टीमध्ये लागला. त्यावेळी कोलकात्यात झालेल्या एका कार्यक्रमात संगीतकार रवी यांची त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी विमी आणि त्यांच्या पतीला मुंबईला बोलावलं आणि त्यांची ओळख बी. आर. चोप्रा यांच्याशी करून दिली. चोप्रांनी त्यांना तिथल्यातिथे ‘हमराज’ या चित्रपटाची ऑफर दिली. एका उद्योगपतीची पत्नी म्हणून पार्टीला गेलेल्या विमी, तिथून थेट सुनील दत्तबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी घेऊन बाहेर पडल्या.
१९६७ साली ‘हमराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो सुपरहिट ठरला. या यशामुळे विमी यांच्या करिअरला चालना मिळाली. ६०च्या दशकातच त्या एका चित्रपटासाठी तब्बल ३ लाख रुपये मानधन घेत होत्या. त्यांनी सुनील दत्त, शशी कपूर आणि राज कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. त्यांच्या करिअरला पतीने पाठिंबा दिल्यामुळे सासरच्या लोकांनी त्यांच्या पतीला कुटुंबाच्या मालमत्तेतून बाहेर काढलं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी विमी यांच्यावरच आली होती.
चित्रपट ठरत होते फ्लॉप
आपल्याकडे दुष्काळात तेरावा महिना अशी म्हण आहे. असंच काहीसं विमी यांच्याबरोबर झालं. कुटुंबावर असलेल्या आर्थिक अडचणीच्या काळात त्यांचे चित्रपटही सतत बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू लागले आणि हळूहळू त्यांना काम मिळणं बंद झालं. काही काळातच त्यांची सगळी जमापुंजी संपली. त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काळात त्यांच्यावर पतीकडून अत्याचारही होत होते.
७०च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विमी यांनी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला. कोलकात्यात त्यांनी कापडाचा व्यवसाय सुरू केला, पण तोही अपयशी ठरला आणि शेवटी त्या बेघर झाल्या. पतीपासून वेगळं झाल्यानंतर त्या मनोरंजनविश्वातीलच जॉली नावाच्या एका व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या असं म्हटलं जातं. मात्र, त्याने विमी यांचा गैरफायदा घेत त्यांना देहविक्रीमध्ये ढकललं. हिंसक वैवाहिक आयुष्यानंतर ज्या व्यक्तीकडून त्यांना आधाराची अपेक्षा होती, त्याच व्यक्तीने त्यांचा वापर करून त्यांच्या उरलेल्या सन्मानालाही धक्का दिला. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील या धक्क्यांमुळे विमी पूर्णपणे खचल्या आणि त्यांनी दारूचा आधार घेतला.
वाईट होता शेवट
विमी यांचं निधन २२ ऑगस्ट १९७७ रोजी, दारूच्या अति सेवनामुळे झालेल्या यकृताच्या आजाराने मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये झालं. त्या वेळी त्यांचं वय फक्त ३४ वर्षे होतं. मृत्यूच्या वेळी त्या पूर्णपणे एकट्या होत्या आणि त्यांच्याकडे काहीच उरलेलं नव्हतं. त्यांच्या मृत्यूनंतर जॉलीने त्यांचा मृतदेह हातगाडीवरून नेऊन सांताक्रूझ स्मशानभूमीबाहेर सोडल्याचं सांगितलं जातं. विमी यांना दोन मुलं होती. त्यांचा मुलगा पुढे ओशोचा अनुयायी बनला आणि संन्यासी म्हणून जीवन जगतो. त्यांच्या मुलीबद्दल मात्र फारशी माहिती समोर आलेली नाही.
