'द केरला स्टोरी' चित्रपटावरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच दहशतवादावर आधारित आणखी एक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. '७२ हूरें' ( 72 Hoorain) चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून, हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा : ‘फेव्हरेट गर्ल’ म्हणत रितेश देशमुखने बायकोबरोबर शेअर केला खास व्हिडीओ, नेटकरी म्हणाले “भावा आता रडवणार…” दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांच्या '७२ हूरें' चित्रपटाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला असून, अतिरेक्यांच्या नेत्यांची चिथावणीखोर भाषणाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. टीझरमध्ये दहशतवाद्यांना, "तुमच्या मृत्यूनंतर जन्नतमध्ये ७२ कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील" असे आश्वासन दिले जाते याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हेही वाचा : “मरमर, चिडचिड, रडरड हे शब्द…” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले… '७२ हूरें' चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक युजर्सनी "'द केरला स्टोरी'नंतर आणखी एक प्रोपगंडा चित्रपट…" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी चित्रपटाच्या टीझरला समर्थन दर्शवले आहे. यासंदर्भात "दहशतवाद हा जगभर चिंतेचा विषय आहे, परंतु हे दहशतवादी कोणत्याही इतर ग्रहाचे नाहीत त्यांचा ब्रेनवॉश केल्यामुळे ते जिहादच्या नावाखाली दहशतवादाचा मार्ग पत्करतात" असा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. '७२ हुरें'च्या आमिषाने तरुणांची कशी दिशाभूल होते हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल, असेही निर्मात्यांनी सांगितले. चित्रपटाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली असून, याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.