‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’ म्हणजेच CINTAA मध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. सध्याच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत ८ सदस्यांनी आपल्या पदांचा आणि समितीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण वादावर, ‘सिंटा’च्या अध्यक्षा पूनम ढिल्लों यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर व उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर या सदस्यांनी केलेले आरोप अत्यंत अश्लील व अपमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हेमंत पांडे, मुकेश ऋषी, सहिला चड्ढा, हेतल परमार, पुनीत इस्सार, विंदू दारा सिंग, विकास वर्मा आणि दीपक पराशर अशी राजीनामा देणाऱ्या सदस्यांची नावे आहेत. हे सर्वजण निवडून आले होते. ८ सदस्यांनी एकत्र येऊन राजीनाम्याचे पत्र पाठवले, त्यानंतर हा सगळा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पूनम ढिल्लों, पद्मिनी कोल्हापुरे आणि पॅनेलमधील काही मोजक्या लोकांमध्ये पॅनलचं कामकाज चालतंय, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. सामूहिक निर्णय प्रक्रिया, विचारविनिमय आणि घटनात्मक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे कारण देत ८ जणांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख पत्रात आहे.

राजीनामा देताना या सदस्यांनी काय म्हटलं?

राजीनामा पत्रातील माहितीनुसार, “अध्यक्ष पूनम ढिल्लों यांनी बरेच एकतर्फी निर्णय घेतले आहेत. कार्यकारिणीला पूर्वकल्पना न देता, त्यांचा सल्ला किंवा मंजुरी न घेता त्यांनी स्वतःच्या आयडीवरून सरकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आणि सिंटाच्या अधिकृत आयडीवरून विविध उद्योग संस्था, सरकारी संस्थांसमोर सिंटाचे प्रतिनिधित्व केले. यामुळे सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वाला हरताळ फासला आहे.”

एकूण ११ सदस्यांनी राजीनामे दिले असून त्यापैकी ८ जण कार्यकारिणीचे सदस्य होते, अशी माहिती सिंटाच्या सरचिटणीस उपासना सिंह यांनी दिली. “पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लों आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. मात्र, अद्याप कार्यकारिणी बरखास्त झाली नसल्याचं सिंटाच्या कायदेशीर सल्लागारांनी म्हटलंय.

पूनम ढिल्लों यांची आरोपांवर प्रतिक्रिया

पूनम ढिल्लों आरोपांना उत्तर देत म्हणाल्या, “त्यांच्या इच्छेनुसार गोष्टी घडत नव्हत्या, एवढंच आहे. ‘सिने आर्टिस्ट्स वेल्फेअर ट्रस्ट’च्या (CAWT) माध्यमातून ते सिंटाच्या सदस्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात यश न आल्याने त्यांनी आमच्यावर विचित्र आणि गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.”

अत्यंत चुकीचे आणि संतापजनक आरोप – पूनम ढिल्लों

त्या पुढे म्हणाल्या, “हे आरोप किती खालच्या पातळीचे होते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आम्ही प्रत्येकाविरोधात मानहानीची कारवाई करू शकतो, इतके ते अपमानास्पद होते. आमच्याविरोधात अपमानास्पद भाषेत असे दुखावणारे आरोप केले गेले.” आपण अनेकदा सिंटा कार्यकारिणी सोडण्याचा विचार केला होता, असं पूनम यांनी आरोपांबद्दल बोलताना सांगितलं. “त्यांच्याकडे दोन-तीन भाडोत्री प्रवक्ते होते जे अशा पद्धतीने बोलायचे. त्यातील एक-दोघे सिंटाचे सदस्यही होते आणि त्यांनी अत्यंत चुकीची व संतापजनक वक्तव्ये केली. तरीही आम्ही शांत राहिलो. पण मला एकच सांगायचंय- माझा आत्मसन्मान आणि निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही जे काही आहोत, ते एका रात्रीत मिळवलेलं नाही, अनेक वर्षे काम करून ही प्रतिष्ठा कमावली आहे. चार-पाच दशकांच्या चांगल्या वर्तनातून, आदरातून आणि लोकांबरोबरच्या चांगल्या संबंधांतून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय,” असं पूनम ढिल्लों म्हणाल्या.

“आम्ही या इंडस्ट्रीत ४२ वर्षांपासून काम करतोय. काही ४५ ते ४८ वर्षांपासून काम करत आहेत. एवढ्या वर्षांनंतर आम्ही असा विश्वासघात करू शकतो असं तुम्हाला खरंच वाटतं का? गेल्या दीड वर्षात मला अनेकदा सिंटा सोडून द्यावं वाटलं, कारण या लोकांनी इतक्या अडचणी आणल्या. प्रत्येक उपक्रमाला आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचा केवळ विरोधच असायचा,” असं पूनम ढिल्लों म्हणाल्या.